// सोयरे वनचरे … रेखिती रंगविती //
- प्रमोद वसंत बापट
- प्रमोद वसंत बापट
“ आपली प्रिय मातृभूमी परसत्तेच्या मगरमिठीतून मुक्त होऊन आता स्वतंत्र झाली आहे. आज आपली संस्कृती आणि कला यांचे मर्म सहानुभूतीपूर्वक परिशीलन केले जाणे अवश्य असून आपल्या कलेचे वैशिष्ट्य काय आहे आणि आजच्या परिस्थितीत ते कसे पुनरुज्जीवित करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपली स्वतंत्र कलापद्धती निर्माण करून कालानुरूप आपले अस्तित्व कलेच्या इतिहासात कलारुपाने ठेवावयाचे आहे."
- गुणवंत हणमंत नगरकर, १५ ऑगस्ट १९४७.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे ग्रहण सुटेल, सुटावे असे वाटत होते. लेखाच्या आरंभी ज्येष्ठ चित्रकार नगरकरांनी पहिल्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातील अवतरणातून हीच आशा आणि अपेक्षा व्यक्त झालेली दिसते आहे. असेच मनापासून वाटणारा प्रतिभावंत कलावंतांचा समूह त्या दिशेने काम करीत राहिला. म्हणूनच कलाजगतातील उपेक्षा, प्रसंगी कारागिरी अशी अन्याय्य आणि निराधार टीका सोसूनही व्यक्तिचित्रं आणि वास्तवदर्शी शिल्पांचे अस्सल भारतीय आविष्कार आपण आजही पाहतो आहोत.
पुरातन काळापासून चालत आलेला वास्तवदर्शी व्यक्तिचित्रणाचा आणि शिल्पांचा हा गौरवशाली वारसा सतत प्रवाहित रहावा, नवोन्मेषशाली रहावा यासाठी ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी सुरू केलेल्या एका कलाचळवळीच्या दुसऱ्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने या साऱ्याचे स्मरण झाले.
वर्ष होतं २००६. वृत्तपत्रांत ठसठशीतपणे वृत्त प्रकाशित झालं होतं की व्यक्तीचित्रांच्या जागतिक स्पर्धेत वासुदेव कामत यांच्या चित्रकृतीला प्रथम पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. आणि तेव्हापासून वासुदेव कामतांबरोबरच 'व्यक्तीचित्र' अर्थात पोर्ट्रेट या कलाप्रकाराकडे पुन्हा एकदा कलाजगताचे लक्ष आकर्षित झाले. त्या स्पर्धेचे आयोजन अमेरिकन पोर्ट्रेट सोसायटीने केले होते. आणि सर्व जगातून मोठ्या संख्येने मान्यवर चित्रकार त्यात सहभागी झाले होते. वासुदेव कामत त्या आधीपासुनच वास्तवदर्शी चित्रशैलीत व्यक्तीचित्र, प्रसंगचित्र, संकल्पना चित्रमालिका यांत काम करीत होते. आपल्याकडील चित्रकला समीक्षकांनी आधी खूप उपेक्षिलेल्या या शैलीविषयी याच काळांत ज्येष्ठ चित्रकार आणि कलासंरक्षक - समीक्षक श्री. सुहास बहुळकर, स्वतः वासुदेव कामत यांचे लेखनही प्रकाशित होत होते. सा. विवेकच्या कोशमालिकेतील 'दृश्यकला'' कोश' प्रकाशित झाला. एकूणच अस्सल भारतीय वास्तवदर्शी चित्रशैलीविषयी कलावंत, रसिकजन, ग्रंथ प्रकाशक अशा विविध संबंधित घटकांत अपार औत्सुक्य आणि आस्था..अपेक्षाही निर्माण झाल्या. 'संस्कार भारती' या कलाक्षेत्रातील संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वासुदेव कामतांची निवड झाली आणि त्या मार्गानेही चित्रकला या कलाविधेत विशेष उपक्रमांचे आयोजन होऊ लागले.
अशा काहीशा अनुकूल स्थितीतून प्रत्यक्ष कृतीप्रवणतेकडे नेणारी एक संकल्पना वासुदेव कामतांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी आकाराला आली. ती होती "पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप" या फेसबुकावरील समूहाची स्थापना. वास्तवदर्शी व्यक्तिचित्रशैलीत अनेकानेक तरूण चित्रकारांनी काम करावे, यांतील प्रयोगशीलतेचे, संभावनांचे क्षितिज विस्तारावे, आविष्कारांना लोकस्वीकृती, लोकप्रतिष्ठा मिळावी, कलाजगतातील चिंतकांचे, समीक्षकांचे पाठबळ मिळावे यासाठी चाललेल्या ध्यासाचेच दुसरे नाव होते....'पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप' !
दोन वर्षांत विविध उपक्रमांतून हाच ध्यास प्रकट होत गेला. शेकडो तरूण चित्रकार त्यांत सहभागी होत गेले. आपापली कलाकृती ते या फेसबुक समूहात प्रदर्शित करु लागले. त्यांवर चर्चा, मान्यवरांची मतप्रदर्शने, कला-बोध, दृष्टिकोन अशा अंगाने वास्तवदर्शी व्यक्तिचित्र शैलीवर एक महामंथनच सुरू झाले. कोणत्याही कलेच्या विकसनासाठी नेमके हेच हवे असते. ती केंद्रस्थानी ठेवून संबंधित घटकांनी तिचे निरीक्षण करणे हितकारी असते. तेच इथे होत होते.
द्वैमासिक स्पर्धेचा उपक्रम आकाराला आला. त्याला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. गत वर्षी सातारा येथील श्री.मनोज साकले या तरूण चित्रकाराच्या चित्रकृतीला प्रथम पुरस्कार मिळाला आणि 'वासुदेव कामत ग्रँड प्राईझ ट्रॉफी' प्रदान करुन गौरविण्यात आले.
या वर्षीही अशा द्वैमासिक स्पर्धा घेऊन त्यांतील विजेत्यांची स्पर्धा दि.५ आणि ६ मार्च या दोन दिवसांत बोरिवली पश्चिमेतील बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्या वनविहार उद्यानात आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षिकोत्सवात घेतली गेली. या दोन दिवसातील कार्यक्रमांची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रथम दिनी सकाळी चार मान्यवरांची व्यक्तिचित्र प्रात्यक्षिके आणि दुपारनंतर त्या चित्रांवर त्यांचे भाष्य, वासुदेव कामतांबरोबर प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम झाला. स्वतः वासुदेव कामत (जलरंग), बनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्रा. एस्.प्रणाम सिंह (पेस्टल), मनोज साकले (तैलरंग) आणि चंद्रजित यादव(मातीचे उठिवशिल्प) असे चार विविध माध्यमांत काम करणारे मान्यवर चित्रकार त्या मोकळ्या उद्यानातील एका भागात चार बाजूला आपापली चित्रनिर्मिती करीत होते आणि मध्यभागी उभा असलेला एक तरुण त्यांचा चित्रविषय होता. पण आणखीही एक वैशिष्ट्य मुद्दाम सांगायला हवे. हा तरूण गोपाळाच्या वेषात होता आणि त्याच्या शेजारी एक जिवंत गाय आणि तिचे वासरुही होते. माणसाच्या जगण्यात साहचर्य देणारे हे असे घटक त्याचं जीवन, चरित्र घडवतात. कदाचित चित्रही....!
व्यक्तिचित्र शैलीतील कलाविष्काराच्या किती वेगवेगळ्या कक्षांचा एका अर्थी विस्तार इथे पहायला, अनुभवायला मिळत होता. उघडी...मोकळी जागा, लहरी उन्हाच्या प्रतिक्षणी बदलत्या छटा, सावल्यांचे चंचल नर्तन, प्रकाशाचे बदलते पोत, चढत्या उन्हात उभ्या गोपाळवेषधारी तरूणाचे प्रतिकूलता सोसणे आणि भरीस भर म्हणून स्थिर रहा असे सांगणेच गैर ठरविणारी गायवासरांची जोडी. अशा चल घटकांना चित्रफलकावर स्थिर होताना पाहणे हा खरंच वेगळा अनुभव होता...मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरूण कलावंत अन् सार्ववयीन रसिकांसाठीही.
या महानुभवात गोपवेषात सहभागी झालेला साताऱ्याचा विठ्ठल कल्लूर हा तरूण स्वतः उत्तम चित्रकार आहे.त्या यमुना गाय अन् तिच्या बछड्याला मात्र आपण सर्वांच्या आस्थेचा ...आकर्षणाचा विषय आहोत हे कळले असेल..... अन्यथा माणसांहूनही थोडा अधिक शहाणपणा दाखवीत अपरिचित गोपाळाबरोबरची स्नेहयुक्त जवळीक त्यांनी सहन केलीच नसती.
संध्याकाळी या मान्यवरांनी आपापल्या कलाकृतीविषयी केलेल्या भाष्यांतून उपस्थित तरूण कलावंत आणि कलारसिकांचे प्रबोधनच झाले. वासुदेव कामतांना अनेक प्रश्न विचारून या अनोख्या प्रयोगात अधिकाधिक उपस्थितांनी आपला सहभाग नोंदविला. चित्र कसे पहावे ? या प्रश्नाच्या उत्तरातून चित्रवाचन, चित्रसाक्षरतेचा पाठच समोर उलगडत गेला.
दुसरा दिवस हा स्पर्धायुक्त प्रात्यक्षिकांचा होता. गत वर्षातील द्वैमासिक स्पर्धांतील विजेते सहा प्रतिभावंत चित्रकार आपापल्या चित्रविषय असणाऱ्या व्यक्तींसह वनविहार उद्यानात उपस्थित होता. स्पर्धेमुळे सर्वत्र काहीसं औत्सुक्य आणि काहीसा तणाव असं संमिश्र वातावरण तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेला कलारसिकांचा समुदाय अनुभवीत होता. अजय देशपांडे (यवतमाळ), राजेश सावंत (नाशिक ), स्नेहल पागे(पुणे), अक्षय पै(मुंबई ), नानासाहेब येवले (संभाजीनगर) आणि अमित धाने (पुणे) असे सहा गुणवंत चित्रफलक आणि चित्रविषय असलेल्या व्यक्तींसह सिद्धता करीत होते. ठीक साडे नऊ वाजता पहिला बिंदू, पहिली रेषा सहा फलकांवर उमटली आणि पुढचे चारेक तास फलक सचित्र होत गेले. चित्ररसिकांच्या डोळ्यांसमोर लखलखत उमटणाऱ्या रेषांचे नर्तन, कळत-नकळत प्रकट होणारे आकार...कधी खरे कधी भासमान, जाणवावे एक आणि अवचित साकार व्हावे भलतेच अशी होणारी सुखद फसगत...अशा खेळातून फलकावर घडणाऱ्या चित्रासोबतच चित्ररसिकही घडत होता. चित्रकार अमित आणि नानासाहेब जलरंगात तर अन्य चौघे तैलरंगात काम करीत होते. वेगळी माध्यमे, वेगळ्या शैली, वेगळा चित्रविचार यांतून हा आनंददायी शिक्षणानुभव बहुपेडी होत गेला.
दुपारपर्यंत चित्रे पूर्ण झाली. प्रणामसिंहजी, विजय आचरेकर, प्रकाश , गतविजेता मनोज साकळे आणि वासुदेव कामत यांनी पांचामुखी चित्रपरिक्षण केले आणि एकमुखी निर्णय केला. पुण्याच्या स्नेहल पागे या एकमेव स्पर्धक चित्रकर्तीला रू. ७५,०००/- चा प्रथम पुरस्कार आणि वासुदेव कामत ग्रँड ट्रॉफी प्रदान करण्यात आली. अक्षय पै रु. ५०,०००/- च्या द्वितीय आणि नानासाहेब येवले रु. २५,०००/- च्या तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. तर अन्य तिन्ही सहभागी चित्रकारांना प्रत्येकी रु.१५,०००/- चे सहभागिता पुरस्कार देण्यात आले.
या शिवाय Camlin या रंगसाहित्य निर्मितीत अनेक दशके सक्रीय कंपनीच्या वतीने प्रत्येक चित्रकार स्पर्धकांना पुरस्काररुपात देण्यात आलेला कोरा canvas आणि रंगसाहित्य भविष्यकाळात रूपबद्ध व्हाव्यात अशा कलाकृतींच्या निर्मितीचा ' सुंदर चित्रे तयात रेखा' असा संकेत देत होते.
नागपूरचे दर्डा फाऊंडेशन, दिल्लीतील अमितजींसारखे दानशूर रसिक, बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे विनोद घेडिया, जन सेवा केंद्र आणि अशा अन्य काही सुहृदांनी हा नवनिर्मितीचा हिंदोळा हलता केला आणि त्यामुळेच पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपचा हा अनुपम चित्रसोहळा सुफळ संपूर्ण झाला.
आता तर या समूहाचे संकेतस्थळही निर्माण झाले आहे ज्याचे इथेच ऊद्घाटन झाले. पुन्हा या नव्या वर्षाच्या स्पर्धांचे विषय, कालावधी, नियम प्रसिध्द होतील आणि नव्या व्यक्तिचित्रांचे चांदणे आपल्या कलांगणात चमचमू लागेल.
त्याच्याच प्रतीक्षेत निघणाऱ्या प्रत्येकाच्या मनांत बोरकरांचे शब्द रुणाझुणत आहेत....
'घाटामध्ये शिरली गाडी, अन् रात्रीचा पडला पडदा