वाटेवर चालताना झाडाचं एखादं पान वाऱ्यावर लहरत लहरत आपल्या हातात विसावावं..किंवा झाडीत दडलेल्या एखाद्या पक्षाच्या गाण्याची एखादी लकेर कानी यावी आणि मग तीच पूर्ण वाटभर आपल्या सोबत करण्यासाठी आपल्या ओठावर रूजावी....
असं होतं ना? होय..अनेकदा होतं असं.
मग चालता चालता मन विचारात गुंगून जातं. हे पान काय घेऊन आलंय? का? आपल्याच हातावर, खांद्यावर का विसावलं असावं? गाण्याची लकेर कोणती खूण सांगत आली असावी? कुणाचा संदेश..गूज...?
मनाला चाळा लागतो आणि मन विणू लागतं एक नवं नव्हाळीचं...नवलाईचं जग कधी त्या पानाभोवती...कधी गाण्याभोवती.
तसंच काल झालं. फेसबुकावर सरकत सरकत पुढे जाताजाता एक पान ओघळून माझ्याकडे आलं. आमचा संवाद वाचक समूहातल्या सुबोध केंभावीच्या एका नोंदीचं पान फुलपाखरासारखं नाचत बागडत मनात स्थिरावलं. तो एक उर्दू शेर होता. शायर होते नून मीम राशिद. तो शेर असा होता....
ये क्यूँ कहें कि हमें कोई रहनुमा न मिला
मगर सरिश्त की आवारगी को क्या कीजे ||
वाचता वाचताच मनात त्याच्या अनुवादाचे शब्द फेर धरू लागले. हाती आलेल्या पानालाच पालवी फुटावी तसं काहीसं घडत गेलं आणि एक पूर्ण कविताच आकाराला आली. कुण्या अनोळखी पक्षाचं अपरिचित गाणं मनात रूणझुणत पूर्ण होत होतं. झपाट्याने तेच लिहून काढलं.
हे सारं घडताना हा शायर कोण? कुठला? काळ ? अशा कोणत्याही प्रश्नांचे गतिरोधक आसपास नव्हते. उलटपक्षी उतारवाटेवर बळ न लावता चाकांनी वाहन पुढे न्यावे तसा सहज..नकळतच सारे घडले. आजही ती माहिती मला ज्ञात नाही. तिची आवश्यकताच वाटली नाही. ती असती तर कदाचित हे घडलेही नसते.
बहुधा माझं नातं त्या संपूर्ण वृक्षाशी नसून त्या पानाशीच असावे वा गाणाऱ्या पक्षाशी नसून त्याच्या गाण्याशी...लकेरीशीच असावे. तूर्तास तेच पुरेसे आहे.
पहा...तुम्हांलाही तसंच वाटतंय का ....
मूळ शेर :
ये क्यूँ कहें कि हमें कोई रहनुमा न मिला
मगर सरिश्त की आवारगी को क्या कीजे ||
आणि अनुवाद...या शेराचा ....नव्हे शेरापाठोपाठ आलेल्ली पूर्ण कविताही...!!
कसा करावा दावा नव्हता कुणि कैवारी |
वृत्तींमधले वादळ होते असे अघोरी ||
वाऱ्यावरच्या पिसाप्रमाणे जगणे माझे |
सावरणारे कसे सोसले असते ओझे ||
म्हणून असतो अनिर्बंध अन् विमुक्त ऐसा |
स्वैर विहरतो मृगजळातला बनून मासा ||
कधि गगनातिल गंगेमध्ये उडून शिरतो |
तुटतो ताऱ्यापरि वाऱ्यावर क्षणि भिरभिरतो ||
परंतु करतो गाफिल जेव्हा डंख यशाचा |
पंख पसरूनी मांड मोडतो दहा दिशांचा ||
उडता उडता हे गळणारे पीस वेच तू |
पुनश्च सोडूनी माझ्यापरि हो मुक्तपेच तू ||
© प्रमोद वसंत बापट