Tuesday, 23 July 2019

पानावरचं गाणं..

वाटेवर चालताना झाडाचं एखादं पान वाऱ्यावर लहरत लहरत आपल्या हातात विसावावं..किंवा झाडीत दडलेल्या  एखाद्या पक्षाच्या गाण्याची एखादी लकेर कानी यावी आणि मग तीच पूर्ण वाटभर आपल्या सोबत करण्यासाठी आपल्या ओठावर रूजावी....
असं होतं ना? होय..अनेकदा होतं असं.
मग चालता चालता मन विचारात गुंगून जातं. हे पान काय घेऊन आलंय? का? आपल्याच हातावर, खांद्यावर का विसावलं असावं? गाण्याची लकेर कोणती खूण सांगत आली असावी? कुणाचा संदेश..गूज...?
मनाला चाळा लागतो आणि मन विणू लागतं एक नवं नव्हाळीचं...नवलाईचं जग कधी त्या पानाभोवती...कधी गाण्याभोवती.
तसंच काल झालं. फेसबुकावर सरकत सरकत पुढे जाताजाता एक पान ओघळून माझ्याकडे आलं. आमचा संवाद वाचक समूहातल्या सुबोध केंभावीच्या एका नोंदीचं पान फुलपाखरासारखं नाचत बागडत मनात स्थिरावलं. तो एक उर्दू शेर होता. शायर होते नून मीम राशिद. तो शेर असा होता....

ये क्यूँ कहें कि हमें कोई रहनुमा न मिला

मगर सरिश्त की आवारगी को क्या कीजे ||

वाचता वाचताच मनात त्याच्या अनुवादाचे शब्द फेर धरू लागले. हाती आलेल्या पानालाच पालवी फुटावी तसं काहीसं घडत गेलं आणि एक पूर्ण कविताच आकाराला आली. कुण्या अनोळखी पक्षाचं अपरिचित गाणं मनात रूणझुणत पूर्ण होत होतं. झपाट्याने तेच लिहून काढलं.
हे सारं घडताना हा शायर कोण? कुठला? काळ ? अशा कोणत्याही प्रश्नांचे गतिरोधक आसपास नव्हते. उलटपक्षी उतारवाटेवर बळ न लावता चाकांनी वाहन पुढे न्यावे तसा सहज..नकळतच सारे घडले. आजही ती माहिती मला ज्ञात नाही. तिची आवश्यकताच वाटली नाही. ती असती तर कदाचित हे घडलेही नसते.
बहुधा माझं नातं त्या संपूर्ण वृक्षाशी नसून त्या पानाशीच असावे वा गाणाऱ्या पक्षाशी नसून त्याच्या गाण्याशी...लकेरीशीच असावे. तूर्तास तेच पुरेसे आहे.
पहा...तुम्हांलाही तसंच वाटतंय का ....
मूळ शेर :

ये क्यूँ कहें कि हमें कोई रहनुमा न मिला

मगर सरिश्त की आवारगी को क्या कीजे ||
आणि अनुवाद...या शेराचा ....नव्हे शेरापाठोपाठ आलेल्ली पूर्ण कविताही...!!


कसा करावा दावा नव्हता कुणि कैवारी |
वृत्तींमधले  वादळ  होते  असे  अघोरी ||

वाऱ्यावरच्या पिसाप्रमाणे जगणे माझे |
सावरणारे कसे सोसले  असते ओझे ||

म्हणून असतो अनिर्बंध अन् विमुक्त ऐसा |
स्वैर विहरतो मृगजळातला  बनून मासा ||

कधि  गगनातिल   गंगेमध्ये  उडून  शिरतो |
तुटतो ताऱ्यापरि वाऱ्यावर क्षणि भिरभिरतो ||

परंतु करतो गाफिल जेव्हा डंख यशाचा |
पंख पसरूनी मांड मोडतो दहा दिशांचा ||

उडता उडता हे गळणारे  पीस  वेच तू |
पुनश्च सोडूनी माझ्यापरि हो मुक्तपेच तू ||

© प्रमोद वसंत बापट

Wednesday, 3 July 2019

आज आषाढाचा पहिला दिवस...
संस्मरण कवितांचे... मित्रांचे...
स्वागत आषाढमेघाचे...
आणि
हरवलेल्या संवादाचे...
        ~~~~~~~~~~

मित्रा मेघा.....

तू आर्तांची व्यथित हृदये दर्शने शांतवीशी
आर्द्रच्छाया शिरि धरुनिया लोपवीशी उदासी |
कीर्तीगीते गुणधवल ती ऐकुनी श्याममेघा
ध्यातो आम्ही तुजसि भावे तूच उःशाप देगा ||

'संवादा'चे सहचर अम्ही आजला शापदग्ध
भेटीगाठी मुळि न उरल्या अंतरे मूक-मुग्ध |
'संवादा'ची पुनरपि करी वाहती शब्दगंगा
आषाढाच्या प्रथम दिनि या दूर नेई वियोगा ||

सांगायाचे म्हणुनि जपले मानसी केवढाले
मित्रा मेघा ! तुजपरि मनी मेघ दाटूनी आले |
बंधुत्वाचे तरल ऐसे गूज तू जाणुनीया
'संवादा'च्या फिरुनि भिजवी शब्दधारेत काया ||

मित्रा मेघा ! कविकुलगुरू कालिदासा स्मरोनी |
उःशापाते मधुरमंत्रित देइ आषाढपाणी ||

© प्रमोद वसंत बापट
आभाळाच्या भाळावर
झुले मल्हाराचे पीस
आज ओलाचिंब दिस

पंख पाण्याचे लावून
फिरे मातीचा सुवास
आज ओलाचिंब दिस

दाट श्यामल घनाचा
वीज पिंजते कापूस
आज ओलाचिंब दिस

ओल्या नक्षत्रांचे देणे
भिजविते धरित्रीस
आज ओलाचिंब दिस

रिमझिमतो अंतरी
मेघमित्र कालिदास
आज ओलाचिंब दिस

© प्रमोद वसंत बापटआषाढाच्या पहिल्या दिवशी....

आषाढाच्या पहिल्या दिवशी
लिहिता काही...
खरे सांगतो
यांत आपुले काही नाही !

श्रेय तयाचे आषाढाच्या
स्नेहल..श्यामल
मत्त घनाचे
कविकुलगुरूच्या
चित्त मनावर
गारूड करत्या
काव्यधनाचे

रसमेघातून
जलरेघातून
रिमझिमते ते...
वनवाऱ्यातून
अन् साऱ्यातून
घमघमते ते...

शब्द आपुले
देती केवळ याची ग्वाही
खरे सांगतो
याहून आपुले काही नाही.

© प्रमोद वसंत बापट

कालिदासदिनाच्या मनःपूर्वक शुभकामना !

Friday, 20 July 2018

कविवर नीरजजी के लिये... 
नीरभरे नयनों से ....

मेघा के संग आज झरे नीरभरे ये नैन |
झरते झरते कह गये अंतर्मन के बैन ||

सरगम साँसों में, धडकन में
                       दे कर वीणागुंजन को |
झरती बूँदोंपर चढ निकले 
                      नीरज ईश्वर रंजन को ||

बूंँदन को सत्संग मिला जो 
                        महक उठी यह बौछारे |
नीरज नैनोंपार हुए पर 
                        मन में कस्तुरी बन ठारे ||

मेघा जब जब बरसेगी 
                        संग बरसेगी नीरजसुरभी |
महके नीरजशब्दों से
                    महकेगा तन-मन-त्रिभुवनभी ||

कविवर नीरजजी को कृतज्ञतापूर्वक अभिवंदन....

© प्रमोद वसंत बापट

Saturday, 22 April 2017

                                                     || मातृभाषा दिन ||


आज २१ फेब्रुवारी ! या लहानशा महिन्यात एका लहानश्या देशातील नागरिक आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होते. या लढ्यात एक महत्वपूर्ण निजखूण त्यांचे बलस्थान होत होती. ती निजखूण होती....भाषा ! स्वभाषा !! मातृभाषा !!!अस्तित्वाला अर्थ देणारी ही निजखूण जपण्यासाठी प्राणही पणाला लावण्याचे प्रेरणाबळ त्या नागरिकांना मिळाले.
एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या विभाजनाची दुःखद घटना घडली आणि मुख्य किंवा मोठ्या भूभागापासून दुरावलेल्या भूभागातील नागरिकांचे दुःखपर्व सुरू झाले. दोन्ही दिशांना...पूर्व आणि पश्चिम !
विभाजनपूर्व भारतात विशालतेमुळे वैविध्य होतं .... भरपूर होतं. पण तुटलेपण नव्हतं. पोरकेपण नव्हतं. एक साहजिक, आंतरिक झुळझुळणारा एकात्मतेचा झरा होता. तोच सर्वांना वैविध्यातही दूरत्वाची झळ लागू देत नव्हता. भाषा, भूषा, प्रथा, पर्व, आहार, विहार अशा अनेकांगानी हे वैविध्य दृश्यमान होत होते पण त्यातही बहुरंगी इंद्रधनुष्याची मनोज्ञ रम्यताच जाणवत होती. एकाधिक स्वरांची आस एकमेकांत गुंफून श्रुतिसुंदर गीतधून गुंजत रहावी तसेच आंतरगान इथे दरवळत राहिले होते.
भारतावर गिद्धनजर ठेवलेल्या आक्रमकांनी, परक्या राज्यकर्त्यांनी, त्यांनीच उभारलेल्या ज्ञानपोईवर आपली तृष्णा भागविलेल्या परपुष्ट पंडितांनी ही बहुरंगी रांगोळी विस्कटून टाकण्याची, ही गीतधून उसवून टाकण्याची पराकाष्ठा शतकानुशतके केली. दंड आणि दाम अशा दोन्हीही आयुधांनी एकात्म भारताचा शिल्पभेद मात्र अयशस्वी होत होता. शतकानुशतके जे साधता आले नाही ते असंभाव्य ठरलेले दुःस्वप्न राष्ट्रविभाजनाच्या कुठाराघाताने साकार करण्याचा संतापजनक प्रयत्न झाला. विभाजनाने दुरावलेला पूर्व आणि पश्चिमेकडील भूभाग पाकिस्तान या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला. केवळ देशनाम बदलून देशातील माणसे, त्यांची मने बदलता येत नाहीत. खूप खोल रूजलेल्या निजखूणा घेऊनच तेथील समाज जगत होता. वेगळा देश मिळवूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत नव्हती. तळ नसलेल्या भांड्यासारखे विभाजनाने मिळविलेले राज्य, सत्ता रितेच राहिलेले त्या राज्यकर्त्यांना सहन होत नव्हते. मूळातच नसलेलं ऐक्य कधीच निर्माण झालं नाही. आणि त्यातूनच पश्चिम पाकिस्तानाचे पूर्व पाकिस्तानावर अत्याचार पर्व सुरु झालं. ऐक्य तर नव्हतंच पण आता वैर सुरू झालं. आणि त्या दहशतीचा सामना करणाऱ्या समाजाला दृढतेने उभं रहायचं बळ दिलं भाषेने...मातृभाषेने. स्वाभाषेच्या सूत्राने समाज संघटित झाला. बांगला भाषा संघटित अस्मितेच्या उद्गाराचे केवळ साधन नाही तर प्रेरणा बनली, चेतना बनली. दमनचक्र अधिक भेदक, भेसूर झालं. ते झेलणारं समाजमन आता एकात्म केलं होतं, मोल मोजण्यासाठी सिद्ध केलं होतं. वर्ष १९५२. विभाजनाला उणीपुरी पाच वर्षे झाली होती. आणि या वर्षी दि. २१ फेब्रुवारीला ढाक्यात विशाल जनमेदिनी एकवटून स्वभाषेचा उद्घोष करून आपले अस्तित्व प्रदर्शित करीत होती. हिंस्र सत्ताधीशांच्या दमनाला आव्हान देण्याचे बळ मातृभाषेने दिले होते. आबालवृद्ध नागरिक पुरूष आणि 'बांग्लार मायेरा, मेयेरा सकलई मुक्तियोद्धा' असे गर्जत निघालेल्या मायभाषेच्या लेकीबाळींच्या याच सातत्यपूर्ण लढ्याला पुढे मुक्तीवाहिनीचे संघटित विजिगीषु स्वरूप लाभले आणि उज्ज्वल यशही. १९७१ मध्ये मातृभाषेने मुक्तीचा धवल किरीट या भूमीच्या मस्तकी चढविला.
समाजधारणेची चेतना बनलेल्या स्वभाषा..मातृभाषा या अनन्यसाधारण घटकाची दखल युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा करीत घेतली. या दिवशी २१ फेब्रुवारी या दिवसाला 'जागतिक मातृभाषा दिन' असा सन्मान प्रदान करण्यात आला. पुढे २००८ हे 'आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष' या नावाने साजरे करण्यात आले. त्या वर्षी पुन्हा एकदा २१ फेब्रुवारी या 'जागतिक मातृभाषा दिना'चे महत्त्व उच्चरवाने सांगितले गेले आणि आता प्रतिवर्षी मातृभाषेचे ऋण व्यक्त करण्यासाठी, तिची उपेक्षा थांबविण्यासाठी आणि तिचा यथोचित सन्मान करण्याची आकांक्षा जागविण्यासाठी या दिवशी मातृभाषेचा महन्मंगल जागर विश्वभर करण्यात येतो.
आज या निमित्ताने आपल्या मायमराठीचा आपण भाषाबांधव एकस्वराने जयजयकार करूया. सर्वच व्यवहारात तिची संगतसोबत घेऊया. तिच्या सावलीत आव्हानांची उन्हे सोसण्याचे बळ मिळवूया.
- प्रमोद वसंत बापट
[ २१ फेब्रुवारी १९५२ च्या लढ्यातील हुतात्म्यांचे ढाका विद्यापीठातील ढाका मेडिकल कॉलेजच्या आवारात उभे असलेले स्मारक ...शहिद मीनार ! ]

दि. २१ फेब्रुवारी, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]


                                               || शरदभाऊ जोशींचा जनसंवाद  ||


आज संध्याकाळ एका सामाजिक आनंदाने रंगून गेली. निमित्त होते एका सहनिवासातील कुटुंब संमेलनाचे. आपल्या नागरी जीवनाचे वर्णन छोट्या, विभक्त कुटुंबांच्या उल्लेखावाचून पूर्ण होत नाही. आणि खरंच शेजारी पाजारी सर्वत्रच आपण दोन वा तीन, अगदी क्वचित चार-पाच माणसांची घरं पाहत असतो. ही लहान कुटुंब आणखी लघुत्तम होत जातानाही पाहतो. एका छताखाली जगणारी एकेकटी माणसं. स्नेह, सहवास, संवाद विरहित एकमेका भोवती वावरणारी माणसं. आबालवृद्ध. स्त्रिया. पुरूष. मुलं. मुली. खरंतर मूल. एकुलतं.
पण नागरी जीवनातील हेही सहवैशिष्ट्य आहे की अशी लहानखुरी कुटुंबं इथे या शहरात गर्दी करून राहतात. आणि कधी औपचारिकता म्हणून पण खूपदा आंतरिक आवश्यकता म्हणून.
ही दोन्ही कारणे घेऊन आज सकाळी धुलीवंदनात रंगून झाल्यावर संध्याकाळी उत्तर मुंबईतील बोरिवली पश्चिमेस शिंपोलीत बद्रीनाथ सहकारी गृह संस्थेतील बासष्ट कुटुंबे एकत्र आली. खेळ, लहान मुलांची नाच, गाणी असे नेहमीचे यशस्वी कार्यक्रम सुरू होते. पहिल्या रांगेतून या सहनिवासाचा नागरिक नसलेला एक अतिथी पाहत होता. आत्मीयतेने. आस्थेने. आणि तिसऱ्या रांगेतला मी ते पाहत होतो काहीशा निमूट कंटाळ्याने. अतिथीच्या शेजारच्या आसनावरून कदाचित दिलीप पैही तसेच. आम्ही इथे राहणाऱ्या दीपक शहा या स्वयंसेवक-कार्यकर्त्याच्या नियोजनाने इथे उपस्थित होतो. अर्धा पाऊण तास स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पुढील कार्यक्रमाची सूचना सांगण्यासाठी दीपक शहांनी ध्वनिवर्धक हाती घेऊन आजच्या त्या कार्यक्रमातील अतिथींना पुढे व्यासपीठ सदृश आसनाकडे बोलावले. दिलीपजी आणि माझीही रवानगी त्यांच्या आजूबाजूच्या आसनांवर झाली. दीपक परिचय करून देऊ लागला ......
"आजनु आपडु अतिथी, जो शिक्षा पूर्ण करीने पुरा वख्त समाजनु..समाजमाटे काम करे छे. आ महेमाननु नाम छे, शरदभाई शंकर जोशी ! आज आपडी सामे आ वात करसे..आपडी. आपडे परिवारनी."
आपल्या पोराबाळांच्या नाचगाण्यांनंतर समोर बसलेली मंडळी आपल्या शरदभाऊंचं बोलणं कसं आणि किती स्वीकारतील या प्रश्नानं मी अस्वस्थ ..अवाक्.
पण..... !! शरदभाऊ बोलू लागले आणि .... बघाच.
( शरदभाऊ जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात परिवार प्रबोधनाचे काम करणारे प्रमुख कार्यकर्ते आहेत. दिलीपजी पै कोकण प्रांत कार्यकर्ता आहेत तर याची अनुपम योजना करणारे दीपक शहा कोकण प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख आहेत. )
दि. १३ मार्च, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]