आज लोकमान्यांची पुण्यतिथी. स्तवनाचा दिवस... कृतज्ञ स्मरणाचा दिवस... स्फुरणाचा दिवस.
आज सकाळी बोरिवली पश्चिमेच्या सुविद्या प्रसारक संघाच्या प्रख्यात शाळेत बोरिवली-कांदिवली-दहिसर परिसरातील शाळांतील गुणवान विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत शब्दांनी पूजन केले.
लोकमान्यांनी 'स्वराज्य' मंत्र दिला त्या ऊर्जस्वल घटनेचे हे शताब्दी वर्ष.
त्यानिमित्ताने प्रकाशित झालेल्या "लोकमान्यांची सिंहगर्जना : वेध एका शतकाचा" या डॉ. गिरीश दाबके संपादित ग्रंथात
लिहायला मिळाले.
या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी ... हिंदुसाम्राज्यदिनी या ग्रंथाचे पुण्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.
आज तोच लेख इथे नोंदवतो. पहा .. वाचा..
-----------------------------------------------------------------------------------------------

ll राष्ट्रजागरणाचा 'स्वराज्य'मंत्र ll
बघता बघता आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला येत्या दोन वर्षातच सत्तर वर्षे पूर्ण होतील. सत्तर वर्षे …. जवळपास तीन पिढ्यांचा हा कालखंड. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली माणसे अजून आपल्या आसपास वावरताहेत. पण स्वातंत्र्यासाठी लढलेली, आंदोलनात सहभागी झालेली पिढी आता अस्तंगत झालेली दिसते. मात्र दीर्घायुष्य लाभलेल्या काही मोजक्याच व्यक्ती अजूनही समाजात आहेत. त्यांच्या आठवणी, त्या काळातील घटना, कथा, प्रसंग यांत उरला आहे तो नवलयुक्त रोमांचक थरार. एखाद्या चित्रपटासारखा तो थरार अनुभवला जातो, ऐकला जातो. पण सामान्यत: तो काळ, ती माणसे आता इतिहासाचा भाग झाली आहेत. आणि वर्तमान ?
वर्तमान नवी आव्हाने, नव्या आकांक्षा घेऊन आला आहे. यशाची, संपन्नतेची, समृद्धीची तहान घेऊन आला आहे. ती तहान व्यक्तीची अधिक आहे. व्यक्तिगत सुखांची हाक अधिक तीव्रतेने ऐकली जाते आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न, धडपडही केली जाते आहे. देश म्हणजे देशातील माणसे असे म्हटले जाते त्या न्यायाने देशातील माणसांचे सौख्य हे लक्ष्य अगदीच अस्वाभाविक नाही. पण जेव्हा 'देशातील माणसे' या शब्दातील माणसे हे पद प्रधान होते आणि देश हे पद गौण होऊन जाते तेव्हा देश… राष्ट्र … समाज या महत्वाच्या घटकाचा विसर पडू लागतो आणि त्या पाठोपाठ, किंबहुना त्यामुळेच स्वातंत्र्य या संकल्पनेचा संकोच होत जातो आणि उरते ती केवळ व्यक्तिगत लाभाची तृष्णा.… स्वार्थ. व्यक्तीचे समाजाशी असलेले बंध, नाते, त्याला जोडून आलेली कर्तव्ये, समाजहितासाठी सोसण्याचे बळ, स्वत:बरोबर… स्वत:च्या प्रयासातून समाज…राष्ट्र मोठे करण्यातील सार्थक आनंद अशी स्वातंत्र्य या शब्दाबरोबर येणारी मूल्ये विरत जातात. अशा वर्तमानात 'आझादी ! आझादी !' असे उच्चस्वरात दिलेल्या घोषणा दुमदुमत राहतात. आझादी म्हणजे स्वातंत्र्य. आझादी म्हणजे स्वराज्य. हे केवळ शब्दार्थापुरतेच उरते. कारण या 'आझादी'च्या घोषणेला 'भारत की बरबादी' चे उद्दाम यमक जोडले जाते. हे उघडपणे केले जाते. झुंडीने केले जाते. या अनर्गल घोषणेला टाळ्या पिटल्या जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की यावर आक्षेप घेणाऱ्यालाच अपराधी ठरवले जाते. देशद्रोह दाखवणारा, अडविणाराच देशविघातक ठरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होतो. त्याला प्रसिद्धी मिळते आणि प्रतिष्ठाही. समाजातील उच्चविद्याविभूषित विद्वान, शिक्षक, समाजचिंतक, प्रतिभावंत सारे याची पाठराखण करणाऱ्या समर्थकांच्या झुंडीत गर्दी करतात. 'भारत तेरी बरबादी' म्हणणारे देशभक्त आणि 'भारतमाता की जय' म्हणणारे देशद्रोही असा उफराटा न्यायनिवाडा घेऊन आलेल्या या वर्तमान वर्षातच "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच !" या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेची शताब्दी यावी हा केवळ योगायोग कसा मानावा? हे विपरीत वास्तव नेमके काय सांगते हे समजून घेण्याची आज आत्यंतिक आवश्यकता असतानाच आलेली लोकमान्यांच्या सिंहगर्जनेची ही शताब्दी हे देशहिताचे वरदानच म्हणावे लागेल.
कोणत्याही मंत्राच्या स्फुरणासाठी साधनेची आवश्यकता असते. लोकमान्यांच्या या स्वराज्यमंत्राच्या सिद्धतेसाठीही इथे झालेल्या तप:साधनेची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. कारण "स्वराज्य" हा लोकमान्यांनी
उच्चारिलेला केवळ तीनाक्षरी शब्द नव्हता. तो एखाद्या साधनारत ऋषीच्या मुखातून आलेल्या वेदऋचेसारखा आत्मशोधाचा उद्गार होता. आत्मविस्मृतीची जळमटे झटकून टाकायला लावणारा जागरणाचा हुंकार होता.
'स्व' हे त्याचे आद्याक्षर त्याचेच द्योतक होते. या आत्मविस्मृतीच्या निद्रेचा या समाजमनावर दीर्घकाळ अंमल राहिला होता. काही स्वाभाविक आलेला आणि खूपसा हेतूत: रुजविलेला. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीच्या काळात असेच घडले होते. विजयनगरच्या साम्राज्याच्या अस्तानंतर हतोत्साहित समाजमनावर अशीच ग्लानी आली होती. आणि 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या तरूण शिवबाच्या मंत्रवत शब्दांनी पुन्हा प्रेरणा जागवली होती. त्यातूनच भारतवर्षात नवीन चेतना जागी झाली आणि हिंदवी साम्राज्य ही त्याची फलश्रुती होती.
त्याच उर्जस्वल इतिहासाची पुनरावृती टिळकयुगात होत होती. हिंदवी स्वराज्याला पराभूत करणारे नवे आक्रमक होते ब्रिटीश. व्यापाराच्या मिषाने हिंदुस्थानात आलेले इंग्रज कधी आधुनिक शस्त्रबळाने, कधी कपटाने तर कधी येथील सामन्यात: एकात्म असलेल्या समाजातील भेदांच्या भेगा रुंदावत या भूमीवर स्वामित्व गाजवू लागले. आणि इथल्या देशहितासाठी जागृत, संघर्षशील असलेल्या समाजावर आधुनिक शिक्षणाच्या रूपाने एका नव्या मोहिनीअस्त्राचा प्रयोग करून आपले राज्य दृढ करीत होते. त्याला काही यशही मिळू लागले.
अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरातील पराजयाने हिंदुस्थान खऱ्या अर्थी पराजित राष्ट्र झाले. तोपर्यंत असलेले कंपनी सरकार जाउन प्रथमच एका दुसऱ्या देशाने आपल्यावर पारतंत्र्य लादले होते. आणि नेमक्या त्याच प्रारंभिक वर्षात इंग्रजांनी भारतात आधुनिक शिक्षण देणारी विद्यापीठे स्थापन केली.
या आधुनिक शिक्षणव्यवस्थेतून भारतीय मनांतून आपला समाज, संस्कृती, परंपरा, धर्म अशा आपल्या अस्मितेलाच ग्रहण लावणाऱ्या विषवृक्षाचेच रोपण केले जात होते. आणि दुर्दैवाने त्याला अपेक्षित फळेही लागू लागली होती. आधुनिक शिक्षणग्रस्त तरुणांची मने एका नव्या ग्लानीने बाधित होत होती. भारताचे प्राचीनत्व, येथील समृद्ध संस्कृतीचा वारसा आणि त्याच बरोबर एकराष्ट्रीयत्वाचे अस्तित्वच नाकारणारी एक पिढी आकारास येत गेली. हे तरूण विविध सभा, मंडळे यांतून भारताचा तेजोभंग करणाऱ्या विचारांचे गारुड उभे करीत होते. मातीपासून दूरत्वाची हीच अवस्था भारताचे पारतंत्र्य अधिकाधिक दृढ करीत जाईल ही इंग्रजांची व्यूहनीती यशस्वी होत होती. सुदूर पूर्वेतील एका अलक्षित देवीसाधकाने हे नीट ओळखले होते. रामकृष्ण परमहंस हे त्याचे नाव. यातून निश्चित मार्ग काढील अशा एका गुणसंपन्न तरुणावर त्याची दृष्टी स्थिर होती. नरेंद्रनाथ दत्त हाच तो तरुण जो पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ज्याने व्यापक देशजागरण केले.
लोकमान्यांच्या समोरील देशकालस्थितीच्या आव्हानाचे नेमके स्वरूप लक्षात येण्यासाठी या पार्श्वभूमीचे स्मरण इथे केले. त्यांचे जन्मवर्ष १८५६ आणि विवेकानंदांचे १८६३. परिस्थितीवर आपल्या कर्तृत्वाने मात करणारे समकालीन. एक पश्चिम तटावर आणि दुसरा पूर्व तटावर. दोघेही आधुनिक शिक्षण घेतलेले पण तरीही भान न गमावलेले जागरणकार. पुढे या लोकोत्तर महापुरुषांची दोन वेळा भेटही होते. पण ती पुढे पाहू.
टिळक वयाच्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी रत्नागिरीहून पुण्याला आले. पुढे तीच त्यांची कर्मभूमी झाली आणि आधुनिक स्वातंत्र्यलढ्याची रणभूमीही. पुण्यात डेक्कन महाविद्यालयात बी. ए., एल एल बी चे शिक्षण सुरू असतानाच वासुदेव बळवंतांच्या तेजस्वी क्रांतिपर्वाचे ते साक्षीदार होते. सामान्यत: शनिवार-रविवारी खुन्या मुरलीधराच्या मंदिरात होणाऱ्या वासुदेव बळवंत फडके आसपासच्या तरुणांना एकत्र जमवीत. अशा बैठकीत टिळक सहभागी झाले. आणि त्यांच्याही हृदयात ती राष्ट्रकार्याची ज्योत तेवू लागली. सहाध्यायी गोपाल गणेश आगरकरांबरोबर रात्री सादिलबुवाच्या टेकडीवर फिरायला जात. गप्पा अर्थातच देशाच्या दु:स्थितीविषयीच होत असत. रात्रीच्या अंधारात या दोन ज्योती देशाच्या भाग्योदयाचा मार्ग शोधत होत्या. चर्चा, मते-मतांतरे होत होती पण या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी… आपण काहीतरी करायला हवे या विषयी एकमत असे. 'निबंधमाले'तून विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनातून मनातील संकल्प घट्ट होत गेले आणि चिपळूणकर नवी शाळा सुरू करीत असल्याचे कळताच टिळक-आगरकर-चिपळूणकर हे त्रिदल राष्ट्रशंकराच्या पूजनास सिद्ध झाले. लोकजागरणाची पहिली अक्षरे उमटू लागली. आधुनिक शिक्षण हे जेत्यांचे शस्त्र असेल तर राष्ट्रीय शिक्षण हेच त्याला प्रभावी प्रत्याघात करेल असा विश्वास या त्रयीच्या मनात होता. 'राष्ट्रीय शिक्षण' हे टिळकप्रणीत स्वराज्यमंत्राचे प्रथमाक्षर प्रत्यक्ष कृतीतून उमटत होते. १८८० या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना झाली. औपचारिक शालेय शिक्षणाबरोबरच लोकशिक्षणाचे माध्यमही वर्षभरात आकाराला आले. २ जानेवारी १८८१ या दिवशी 'मराठा' या इंग्रजी आणि ४ जानेवारी १८८१ या दिवशी 'केसरी' या मराठी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
हे एक मन्वंतर होते. श्री. म. माटे या केसरीउदयाची दोन वैशिष्ट्ये नोंदवतात. ती लक्षणीय आहेत. माटेमास्तर म्हणतात, "केसरीने मोठ्या आग्रहाने प्रतिपादन करून आपला मतपंथ प्रस्थापित केला आणि त्यासाठी सर्व तऱ्हांच्या आपत्ती सोसून या मतपंथाची मते समाजात सर्वदूर पसरवून देशभर कडक असंतोष उत्पन्न केला. ही केसरीची दोन महत्वाची कार्ये होत." ही दोन्ही कार्ये नीट समजून घ्यायला हवीत. तत्कालीनच नव्हे तर आजच्या आणि उद्याच्याही भारताच्या नवोत्थानाचा हा जणू शिलान्यास होता. कारण इंग्रजप्रणीत शिक्षणाने भारावलेला समाज इंग्रजी सत्तेला ईश्वरीय वरदान समजू लागला होता. वैयक्तिक सुखविलासात रमून गेला होता. आपले ते सर्व हिणकस आणि इंग्रजांचे ते सर्व श्रेष्ठ अशा आत्मघृणेने तो ग्रासून गेला होता. आणि म्हणूनच टिळक राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता आग्रहाने मांडत होते. टिळकांच्या दृष्टीने शिक्षण ही कृती असेल तर राष्ट्रीय हे त्याचे केवळ विशेषण नव्हते. तर ते त्याचे प्रयोजन होते. सोलापुरात भाषण करताना टिळकांनी अत्यंत सोप्या शब्दांत राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या सांगितली आहे. ते म्हणतात, "आपण कोण, आपली स्थिती काय आहे, पुढच्या पिढीने काय करावे, पोट कसे भरावे आणि देशाची कामगिरी काय आहे यांची ओळख करून देणारे शिक्षण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण होय." सकृतदर्शनी अत्यंत बाळबोध वाटणाऱ्या या व्याख्येतून टिळक किती सांगून गेले आहेत. आपण कोण म्हणजे माझा वारसा,ओळख काय आणि त्यातून कर्तव्यही काय हा पहिला बिंदू आणि आपल्या देशाची कामगिरी म्हणजे संस्कृती आणि इतिकर्तव्यता कशात आहे हा पाचवा बिंदू कसा चढत्या क्रमाने विकसनाच्या पायऱ्याच दाखवतो. हे महत्वाचे अशासाठी आहे की याच्या अभावामुळे होणारे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्खलन अंतिमत: साऱ्या समाजाला सोसावे लागते असा अनुभव आहे. आणि म्हणूनच स्वराज्यसन्मुख समाजासाठी ते अनिवार्य ठरते. दुर्दैवाने याच्याकडे पाठ फिरविणाराच प्रतिष्ठित होताना दिसतो. तेव्हाही आणि आताही. उदाहरणार्थ " इंग्रज लोकांनी इकडे राज्य संपादन केले याचे कारण विचार केला असता असे दिसते की हिंदू लोकात मूर्खपणा वाढला आणि तो दूर करण्यासाठी हे गुरू दूर देशांतून ईश्वराने इकडे पाठवले." असे लिहिणारे लोकहितवादी हे प्रातिनिधिक समजावेत. स्वजननिंदा आणि स्वदेशघृणा आग्रहाने मांडणारी एक भारतद्वेषाची परंपरा इथे फोफावत होती. प्रतिष्ठा पावत होती. लोकहितवादी अशा विद्यापीठाचे आद्य कुलगुरू शोभावेत. आजही या विखाराच्या खुणा आपल्याला अपरिचित नाहीत. जेएनयु आणि जादवपूर विद्यापीठातील धिंगाणे याचे पुरावेच नाहीत काय? राष्ट्रबाह्य निष्ठांचे पोषण हाच यांचा अभ्यासक्रम असतो. असे विद्रोही फुत्कार हेच यांच्या लेखी मुक्त अभिव्यक्तीचे व्यवच्छेदक लक्षण असते. केसरी संप्रदायाने अशा शिक्षणपद्धतीवरच नाही तर विवेक सोडून वागणाऱ्या अध्यापकांवरही 'हे आमचे गुरूच नव्हेत' अशा शब्दात निर्भयपणे शरसंधान केले होते हे ध्यानात घ्यायला हवे. आजही सामाजिक, वैचारिक पीठांवर असे भारतद्रोही आचार्य प्रतिष्ठित झालेले दिसतात. त्यांना तेथून हटविण्याचे बळ लोकमान्यांच्या विचार परंपरेतूनच आजही मिळेल असा विश्वास वाटतो. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. कारण तेव्हाही हे घडले आहे. लोकमान्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यासाठी स्वकीयांशी, तत्कालीन काँग्रेसच्या धुरिणांशी लोकमान्यांना झगडावे लागले आहे. पण तो केसरीधर्म… सिंहधर्म टिळकांनी आजीवन अंगिकारला. याच धर्मपालनाने केसरीला टिळककाळातच चार खटल्यांचा सामना करावा लागला. त्यातील दोन महत्वाचे. पुण्यातील प्लेगसाथ, इंग्रज अधिकाऱ्यांचे अत्याचार आणि पाठोपाठ चापेकर बंधूंचा पुरुषार्थी प्रतिशोध या घटनाक्रमात केसरीद्वारे टिळकांनी केलेल्या शब्दतांडवाने इंग्रज शासन जेरीला आले. टिळकांवर खटला भरून त्यांना १८ महिन्यांच्या कारावासात डांबण्यात आले. पुढे वंगभंगाच्या विरोधात टिळकांच्याच लेखणीने देशव्यापी वन्ही पेटला आणि १९०८ मध्ये सहा वर्षांसाठी त्यांना मंडालेला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 'जे कार्य मी अंगिकारले आहे ते मी मोकळा राहण्यापेक्षा हालअपेष्टा सोसूनच सिद्धीला जावे अशी जगनियंत्याची इच्छा असू शकेल'' असे म्हणत धीरोदात्तपणे टिळक या शिक्षेला सामोरे गेले.
लोकमान्यांनी 'स्वराज्य' मंत्रातील सत्व या राष्ट्रीय शिक्षणाच्या ध्यासातूनच घेतलेले दिसते. कारण स्वराज्याच्या विचाराचे, स्वराज्य या शब्दाच्या उच्चाराचेही भय त्यांनी पाहिले होते. फिरोजशहा मेहता, गोपाल कृष्ण गोखले आदी देशाचे धुरीणही राष्ट्रीय सभेच्या, म्हणजेच काँग्रेसच्या मंचावरून स्वराज्याची उघड मागणी करण्यास धजावत नव्हते. इथे हे लक्षात घ्यायला हवे की १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याआधी चार वर्षे म्हणजेच १८८१ मध्ये टिळकांनी 'केसरी' सुरू केला होता. आरंभी पुणे आणि महाराष्ट्रभर त्या माध्यमातून टिळकांचा प्रभावही विस्तारत होता. काँग्रेसचे काम मुळातच अखिल भारतीय स्वरूप घेऊन सुरू झाले होते. म्हणजे व्यापक स्वरूप, देशव्यापी समर्थन, विविध प्रांतातून-भाषांतून जोडले गेलेले नेतृत्व आणि सर्वात महत्वाचे हे की एक चळवळ अथवा संघटन म्हणून इंग्रजी सत्तेकडून मिळालेली मान्यता एवढी सबळ वैशिष्ट्ये असूनही काँग्रेसच्या नेतृत्वाचीच सिद्धता नसल्याने त्या मंचावरून स्वराज्याच्या मागणीचा प्रथमोच्चार होण्यासाठी तब्बल एकवीस वर्षे देशबांधवांना प्रतीक्षा करावी लागली. वस्तुत: काँग्रेसच्या स्थापनावर्षापासूनच टिळकांनी मन:पूर्वक स्वागत केले होते. केसरीत टिळकांनी लिहिले " सुमारे १०० शिकलेले लोक समान उद्देशाने एकत्र येतात तेव्हा समान राष्ट्रकार्य म्हणून काही एक विचार उत्तम सुशिक्षितांच्या मनात जागृत झाला आहे आणि त्यासाठी प्रतिवर्षी जमण्यासाठी खर्च, कालहानी आणि दगदग करण्यास तयार असलेले बरेच लोक आहेत." पण दोनच वर्षांनी निराश होत लिहिले "दसरा, दिवाळी, मोहरम सारखाच आमच्या सुशिक्षित लोकांना राष्ट्रीय सभेचा दिवस वाटू लागला आहे." पुढे दहा वर्षांपर्यंतही टिळक मोठ्या अपेक्षेने काँग्रेसकडे पाहत होते. पण राजकीय समस्यांकडे बेताच्याच दृष्टीने पाहण्याचे नेभळे धोरण टिळकांना मानवत नव्हते. आणि काँग्रेस नेतृत्वाला टिळक-विचार झेपत नव्हते.
१९०५ मध्ये वंगभंगाचा निर्णय जाहीर झाल्याबरोबर मात्र मोठे परिवर्तन झाले. नेभळट नेतृत्व एकीकडे आणि सारा समाज टिळकांबरोबर असे राजकीय दृश्य समोर आले. प्रथम बंगालात तीव्र प्रतिक्रीया उमटली आणि टिळकांच्या ओजस्वी लेखणीने भारतभर आंदोलन उभे राहिले. आणि या युद्धपर्वात दोन नवी मंत्राक्षरे टिळकांनी समाजासमोर मांडली. ती होती 'स्वदेशी' आणि 'बहिष्कार'. याच आंदोलनात तरुण सावरकरांनी पुण्यात विदेशी वस्त्रांची होळी पेटवली आणि मग देशभर विदेशी वस्त्रांच्या होळ्या धडाडल्या. बंद पडणारे देशी उद्योग, नष्ट होणारी देशी कौशल्ये आणि देशाची होणारी भरमसाठ लूट या आपत्तींवर मात करण्यासाठी टिळकांनी स्वदेशी आणि बहिष्कार असा प्रतिकाराचा दुहेरी मार्ग देशाला दिला. परिणामी देशभर वणवा पेटला.यामागे अर्थविचार तर होताच. त्यातील बहिष्कार ही प्रतिक्रीया होती तर स्वदेशी हे आत्मभान होते. 'स्व' ची जागृती होती. तत्त्वज्ञ टिळकांचा तो आविष्कार होता. राष्ट्राच्या अस्मितेचे ते जागरण होते. 'स्व' या एकाच जोडाक्षरात विस्कटून गेलेल्या राष्ट्रपुरुषाला पुन्हा एकसंध करण्याचे सामर्थ्य होते. 'स्व' या व्यक्तिवाचक शब्दाला 'देश' या समूहवाचक शब्दाने जोडण्याची सूचकता होती. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देशाला स्थान असायला हवे, असते याची जाण 'स्वदेशी'च्या सूत्राने दिली.
स्वाभाविकपणे १९०६ मध्ये कलकत्त्यात होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद टिळकांनाच मिळावे अशी लोकांची मागणी सुरू झाली. पण काँग्रेस नेतृत्वाला मात्र टिळकांना मिळणारी ही लोकमान्यता सहन झाली नाही. त्यांनी दूर लंडनमध्ये असलेल्या दादाभाई नौरोजींचे मन वळवून त्यांना अध्यक्षपदी बसविले. टिळक अध्यक्ष झाले नाहीत पण दादाभाई नौरोजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदुस्थानाला जडलेल्या रोगाला किरकोळ मलमपट्टीचा उपाय पुरेसा नसून मूलभूत असा स्वराज्याचाच उपाय अवलंबिला पाहिजे अशी घोषणा केली. पुढे आग्रहाने असेही सांगितले की "हिंदुस्थानविषयी प्रेम आणि निष्ठा यांनी प्रेरित होऊन शेवटी माझे एवढेच सांगणे आहे की, एकजुटीने आणि चिकाटीने उद्योग करून स्वराज्य मिळवा म्हणजे दारिद्र्य, दुष्काळ आणि प्लेग यांनी मारणारे व उपाशी दिवस कंठणाऱ्या कोट्यावधी देशबांधवांचे रक्षण आणि दुख:निवारण होऊन जगातील अत्यंत वैभवशाली राष्ट्रमालिकेत हिंदुस्थानास पूर्वीचे श्रेष्ठपण प्राप्त होईल." दादाभाई नौरोजींच्या या भाषणासंबंधी टिळकांनी अत्यंत गौरवाने असे म्हटले आहे की, "आजवर या भिंतीवर बुक्क्या मार, त्या खिडकीला धक्का दे असेच चालले होते. पण मुख्य दरवाजा उघडण्याचा मार्ग दादाभाई नौरोजींनी दाखवून दिला. आणि मुख्य दरवाजा उघडला की साऱ्या खिडक्या आपोआप उघडता येतील असे त्यांनीच प्रथम जाहिर केले." एकूणच 'केसरी'तून पंचवीस वर्षे सातत्याने राष्ट्रचैतन्याला जागविण्याच्या टिळकांच्या प्रयत्नांना सर्वंकष लोकमान्यता या अधिवेशनात मिळाल्याचे चित्र दिसून आले. स्वराज्य हे ध्येय आणि राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार ही साधने या टिळकविचाराचा प्रकटपणे स्वीकार झाला. असा समाज स्वराज्याच्या ध्येयाशी एकरूप होत होता पण काँग्रेसच्या मुखंडांना मात्र हे पचवता आले नाही. टिळकांना कटाक्षाने नेतृत्वपदापासून दूर ठेवण्यासाठी अखंड खटपटी करणाऱ्या मवाळ गटाने निर्लज्जपणे हे काँग्रेसचे अखिल भारतीय धोरण नसून केवळ वंगभंगामुळे दुखावलेल्या स्थानीय समाजाचे हे म्हणणे असल्याचे जाहीर केले. असे करण्याने आजवर जोपासलेली राष्ट्रीयत्वाची भावना व्यर्थ ठरत असल्याचे टिळकांनी केसरीतून मवाळांना सुनावले पण लक्षात घेतो कोण ? काँग्रेसला राष्ट्र, राष्ट्रहित, जनभावना यांचे तेव्हाही सोयरसुतक नसल्याचेच दिसून येते. मेहता, गोखले आदी काँग्रेसनेते पुढच्या वर्षी १९०७ मध्ये नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनापासून टिळकांना कसे दूर ठेवावे याच्याच भीतीने ग्रस्त झाले. नागपूरमध्ये डॉ. मुंजे, दादासाहेब खापर्डे अशा टिळकपंथीय नेत्यांच्या भयाने अधिवेशन नागपूरहून हलवून सुरतेला नेले हा पुढचा इतिहास आहे. आणि तो अधिकच निंद्य आहे. पण तो या लेखाचा प्रतिपाद्य विषय नाही.
टिळकांच्या स्वराज्याच्या मागणीमागच्या धारणा या अशा अधिवेशनीय देखाव्यांवर अवलंबून नव्हत्याच. मंच दिलात तर भाषण करीन, आणि भाषणे करूनच मोठा नेता होईन. अशा उथळ मनोवृत्तीतून ते राष्ट्रकारणात आले नव्हते. त्यांनी अत्यंत विचारपूर्वक हा मार्ग निवडला होता. आपल्या स्वराज्य संकल्पनेला रुजविण्यासाठीच त्यांनी आपली वाणी आणि लेखणी काया वाचा मने झिजवली होती. तो त्यांनी वैचारिक ग्रंथाचा विषय बनविला नव्हता तर आचरणाचा धर्म बनविला होता. त्यांच्या अवघ्या जीवनाचा तो निदिध्यास बनला होता. आणि तो त्यांना केवळ त्यांच्याच पुरता ठेवायचा नव्हता. तो त्यांना जनमनांत रुजवायचा होता.म्हणून आरंभापासूनच त्यांनी तो पाकळीपाकळीने विकसित करीत जनसामान्यांपर्यंत उलगडत नेला. अगदी आरंभी शिक्षण, नंतर 'केसरी' आणि 'मराठा'तून लोकशिक्षण या पहिल्या पायऱ्या होत्या. त्या पुढच्या टप्प्यात टिळकांची अनुपम संघटन कुशलता दिसून येते. परंतु संघटनेच्या केंद्रस्थानी टिळक नसतात तर ध्येय असते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्यजनांत श्रद्धा जागरण झालेले दिसते. एकेकट्या व्यक्तीकडून समाजाचा विचार होणे दुरापास्तच म्हणून त्यांनी एकत्र येणे आवश्यक असते. आणि असा एकत्र आलेला समूह स्वत:विषयी किती बोलेल ? आणि त्याचे आत्मपुराण कोण ऐकेल ? मग तो आपसूकच समाजातील व्यवस्थांवर, सुखसोयींवर, समस्यांवर बोलू लागतो. टिळकांनी अतिशय कल्पकतेने हे समूहमन एक केले. जागे केले. अशा जागत्या मनासमोर प्रेरक आदर्श असावा म्हणून शिवजयंतीचे उत्सव सुरू केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ध्येयात आपले सोबती सामील करून घेत हिंदवी स्वराज्याचा संकल्प सिद्धीस नेला. आणि शिवजयंती केवळ शिवपरिचित महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या प्रांतोप्रांती शिवप्रेरणा नेली. लाहोरात लाला लजपतरायांनी उर्दूत शिवचरित्र लिहिले, ते याच उत्सावांना समोर ठेवून. बंगालात गुरुदेव रवीन्द्रनाथांनी 'शिवाजी उत्सव' नावाची अत्यंत ओजस्वी दीर्घ कविता लिहिली ती शिवजयंती उत्सवांसाठीच. उत्सवात वक्ता म्हणून जाण्यासाठी स्वामी विवेकानंद अनेकांना प्रोत्साहन देत राहिले. तेही याच उत्सवांसाठीच. लोकमान्यांनी या सर्व उपक्रमांतून स्वराज्य प्रेरणेचे सर्वत्र पुरेपूर सिंचन केले. आणि नंतरच या समाजाच्या राजकीय आंदोलनात उतरवले. त्यांच्या संघर्षाला स्वराज्याचे उदात्त उन्नत ध्येय दिले. आणि ते रुजल्याची, स्वीकारल्याची खातरजमा केल्यावरच त्याचे मंत्रवत उच्चारण केले. १८८० ते १९१६ हा सव्हीस वर्षांचा प्रदीर्घ काळ लोकमान्य टिळकांनी स्वराज्य मंत्रासाठी मनांची मशागत केली. या प्रदीर्घ काळात सहचारी मित्र जोडले, काही दुरावलेही पण राजकीय स्वराज्याच्या संकल्पापासून माघार घेतली नाही. आधी सामाजिक की राजकीय हा वाद पराकाष्ठेने लढवला. आणि जिंकलाही. लखनौच्या काँग्रेस अधिवेशनातून रेल्वेने परतताना वाटेवर सर्वत्र लोकाना भेटत भेटत येत होते. या वादाची कुणी आठवण देताच म्हणाले, "अरे एकदा मुंबईचे तिकीट काढले ना की वाटेतील सर्वच गावे त्यांत येतात. तसेच स्वराज्याचे आहे. स्वराज्याचे लक्ष्य गाठले की त्या बरोबर सर्व काही मिळवता येते."
दुर्दैवाने लोकमान्यांना स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्रजांहूनही अधिक स्वजनांशीच झुंजावे लागले. वस्तुत: टिळक काय केवळ स्वत:साठी स्वराज्याचा घोष करीत होते ? टिळकांच्या जीवनकाळांत जर स्वराज्य प्राप्त झाले असते तर त्याचा उपभोग ते एकटे घेणार होते ? निश्चितच नाही. उलटपक्षी त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला होता, " स्वतंत्र भारतात आपण कोणत्या पदावर असाल ?" त्यावर टिळकांनी विनाविलंब असे सांगितले होते की, "स्वतंत्र झालेल्या भारतात मी विरोधी पक्षात असेन. कारण तिथूनच मला आमच्या स्वराज्यरक्षणाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल."
स्वराज्याची विशुद्ध संकल्पना मनामध्ये जागी असते तेव्हाच असे म्हणता येते. कारण स्वराज्य या शब्दांत केवळ राज्याचे स्वामित्व नाही तर दायित्वही आहे. आणि दायित्वात द्यायचे असते. दायित्व म्हणजेच देणे. खरे तर टिळकांच्या स्वराज्यगर्जनेनुसार तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार असतो. आणि जन्मसिद्ध गोष्ट कुणी उचलून देत नसतो. जन्मसिद्ध असल्याने ती जीवन जगताना सतत सोबत असते. ती मिळवायची नसते. मिळवायचा असतो तो त्यावरचा अधिकार. त्याच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा अधिकार. आणि अधिकार मिळतो क्षमता सिद्ध केल्यावर. स्वराज्यावरचा अधिकारही असाच मिळवायला हवा. स्वराज्याचे सुराज्य करण्याची क्षमता मिळवण्याच्या अटींवरच स्वराज्यावर अधिकार सांगायचा असतो.
चिरोल साहेबाविरुद्धच्या खटल्यासाठी लोकमान्य जवळपास चौदा महिने इंग्लंडमध्येच होते. त्या काळातील एक आठवण अतिशय मर्मस्पर्शी आहे. टिळकांच्या लंडन मधील निवासकाळात कुणी इंग्रज महिला पत्रकार त्यांना भेटायला आली. काही आरंभिक झाल्यावर तिने विचारले, "मिस्टर टिळक, काय तुम्हाला खरेच वाटते की तुम्हाला स्वराज्य मिळेल ?" टिळकांनी क्षणार्धात विश्वासयुक्त स्वरात ''होय !'' असे सांगितले.
तिनेही गतीने विचारले की, "ते तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहाल काय ?" त्यावर टिळकांनी दिलेले उत्तर अभ्यसनीय आहे.
संथ, शांत पण ठाम स्वरात टिळक म्हणाले, "तुम्ही दर्यावर्दी राष्ट्राच्या नागरिक आहात म्हणून तुम्हाला सहज कळेल असे उदाहरण घेऊन सांगतो. नाविक महासागरावर नौका हाकारीत जातो. कुठेही भूमीचे दर्शन होत नसते. पण त्याचा प्रवास विश्वासाने सुरू असतो. त्याचे लक्ष असते दूर आकाशातील ध्रुवाकडे. तिथे दृष्टी स्थिरावून तो जात राहतो, समोर भूमी दिसत नसतानाही. तसेच आमचे आहे. स्वराज्य हा आमचा ध्रुवतारा आहे. स्वराज्याच्या ध्रुवावरून आम्ही आमची दृष्टी जोवर हटविणार नाही तोवर आम्ही योग्य दिशेने पुढे सरकत राहू असा आम्हाला विश्वास आहे."
लोकमान्यांनी दाखविलेल्या स्वराज्य ध्रुवावर आपली दृष्टी स्थिर आहे ना ? स्वराज्य ध्रुवाचे नाव आता बदलले आहे … सुराज्य ! शेष सर्व तसेच स्थिर, अविचल आहे ना याचीच तपासणी करण्याची आठवण ही "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच !" या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेची शताब्दी करून देत आहे.