Monday, 4 July 2016

आज स्वामी विवेकानंदांचा महासमाधी दिन.
गेल्या तीन- चार वर्षांत स्वामीजींच्या 'सार्धशती' च्या निमित्ताने पुनरपि स्वामीजींचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी लक्षपूर्वक वाचन केले.
त्यातून काही वेगळे हाती लागते आहे असे वाटले आणि त्या अनुषंगाने काही लेखनही झाले. स्वामीजींच्या जीवनात संगीताचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि त्यावरच लिहावेसे वाटले. तसे तेव्हा पुनःपुन्हा लिहिले, 'चार शब्द' दिवाळी २०१२, आणि 'विवेक विचार' २०१३ या अंकात प्रकाशितही झाले.
आज 'विवेक-विचार' मध्ये प्रकाशित झालेला लेख ' स्वामी स्वरगुंजन' अवचित हाती लागला. त्याचेच हे पुनरावर्तन... पुनर्भेट:  

======================================================================

//  स्वामी स्वरगुंजन //

    स्वामी विवेकानंदांच्या या सार्धशतीच्या निमित्ताने त्यांच्या संबंधी पुन्हा एकवार नव्याने लेखन होते आहे,भाषणे होत आहेत. प्रदर्शने मांडली जात आहेत ज्यांतून त्यांची विविध जीवनचित्रे लोकांना पहायला मिळत आहेत. आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या भारतभूमीचे महात्म्य वर्णन करताना तिच्या प्राकृतिक, भौगोलिक वैशिष्ट्ये तर नोंदवली जातातच पण त्याच बरोबर या भूमीवरील संस्कृतीनिष्ठ सुदीर्घ जनजीवन, रीतीभाती, ज्ञानसंपदा निर्माण करणारे महापुरुषही नोंदवले जातात, अभ्यासले जातात. कोणत्याही महापुरुषाच्या जीवन-कर्तृत्वाचे पुण्यस्मरण करतानाही असाच बहुपेडी दृष्टीकोन असायला हवा.
   स्वामीजींचाही असाच सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. पण प्रत्यक्षात होते काय ते पाहण्याआधी महानुभाव परंपरेतून आलेल्या एका सर्वज्ञात कथेचे स्मरण द्यावेसे वाटते.
    ' गावा हस्ती आला ' या लीलाप्रसंगात ही गोष्ट प्रथम वाचल्याचे स्मरते.
एका गावात हत्ती येण्याचे निमित्त घडते. त्याचे चार दृष्टीहीन व्यक्तींनी त्या हत्तीचे केलेले वर्णन एवढीच ती कथा आहे. केवळ स्पर्शज्ञानाच्या पदताळ्यावर केलेल्या चार निरीक्षणांची बेरीज संपूर्ण हत्ती साकार करीत असतात.   
   पण कल्पना करूया की त्या प्रसंगातील हत्ती हा सामान्य हत्ती नसून तो ऐरावत आहे. केवळ स्पर्श-संवेदनेतून तो सापडला असता कात्याच्या धवल वर्णाची माहिती केवळ स्पर्शाने संभवतच नाही. तेथे दृष्टीचेच काम होते. 
  त्यामुळे केवळ काही संवेदनांच्या आधारे केलेले निरीक्षण अपुरे ठरते.
  स्वामीजींच्या जीवनकार्याकडे बघतानाही काहीसे असेच झाले असावे काय ?
  विरागी वृत्तीकडे स्वभावतःच आकृष्ठ होणारे आपले हिंदू मन स्वामी विवेकानंदांना एकाच भिंगातून पाहत राहते. केवळ समाजमनच नव्हे तर त्यांचे चरित्रलेखक,अभ्यासक आणि त्यांच्या जीवनवाटेवरील त्यांचे सहयात्रीही स्वामीजींना वीरतायुक्त विरक्तीच्या एकाच रंगात चित्रित करताना दिसतात. या सार्धशती वर्षात त्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पदर उलगडण्याचे काही प्रयत्न होताना दिसताहेत परंतु ते परिपूर्णतेपासून खूपच दूर आहेत. स्वामीजींची इतिहास दृष्टी , सामाजिक विचार , युगानुकूल धर्मविचाराची मांडणी , सेवाकेंद्रित अध्यात्म , समाजसन्मुख वैराग्य , आधुनिकतेचा स्पर्श घेऊन आलेले विश्वमंगल हिंदुत्व अशा काही विषयांची नव्याने मांडणी होते आहे. पण तरीही त्यांची विज्ञानदृष्टी, कलाविचार , राजकीय निरीक्षणे, संन्यस्त मार्गावरील संघटन या विषयांतील अद्वितीय प्रयोगशीलता अशा विषयांची बरीच व्यापक भुई अजूनही 'नांगरल्याविण ' शिल्लक आहे.
  स्वामीजींच्या जीवनाचा नव्याने अभ्यास म्हणजे त्यांची चरित्रे , भाषणे , स्मरणे , वार्तालाप ,संवाद अशा सर्वच साधनांच्या आधारे त्यांच्याबरोबर पुनश्च चालणे, त्यांचे सहयात्री होणे होय. तसे झाल्यावर येणारी एक अनुभूतीच या लेखातून मांडण्याचा यत्न करणार आहे.
  या वाटेवर धर्म, तत्वज्ञान , सेवाभाव, अध्यात्म, संघटन, समाजजागरण या त्यांच्या कर्तृत्वाच्या विविध आविष्कारांमागे त्यांच्यातील कलासाधकाचे अस्तित्व गानमैफिलीतील तानपुऱ्याप्रमाणे आजीवन गुंजन करताना दिसते. मैफिलीत विविध राग,त्यांच्या बंदिशी मांडल्या जातात पण या सर्व वैविध्याला आधार देण्याचे काम एकाच आधार स्वराचे असते. त्याला षड्ज म्हणतात. स्वामीजींच्या जीवनसंगीताचा असा षड्ज कोणता हे पाहू जाता संगीतातील षड्ज हेच त्याचे उत्तर मिळेल. संगीतविद्येचे इतके प्रत्ययकारी अस्तित्व स्वामीजींच्या जीवनात आढळून येते. 
   लक्षणीय बाब ही की स्वामीजी आपल्या भारताच्या राष्ट्रजीवनाचे वर्णन करताना याच सांगीतिक रूपकाचा आधार घेत असे म्हणतात की," आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार-स्वर षड्जहिंदुत्व हाच आहे !"
   आपल्या समग्र जीवनविचाराची मांडणी हिंदुत्वाच्या आधारावर करणारे स्वामीजी षड्ज या आधारस्वराच्या वरील रूपकातून आपली विचार-प्रक्रिया नेमकेपणे समोर आणतात. त्यांना हे नेमके माहिती आहे की विशुद्ध , अचल आणि विविध स्वरांच्या विकास - विलासासाठी संगीतातील षड्ज हा आधारस्वर आवश्यक असतो तसाच आपल्या विविधतायुक्त राष्ट्रजीवनाला एकाच सूत्रात सुसंघटीत करण्यासाठी एकच आधारतत्व हवे आणि ते हिंदुत्व हेच आहे.
   स्वामीजींची ही परिभाषाच त्यांच्या जीवनातील संगीताचे मध्यस्थान विशद करते.
असे असूनही त्यांचे चरित्रलेखक आणि अभ्यासकांकडून हा षड्जनाद कानाआड कसा झाला असावा ? एक छोटीशी तर्कसंगती सुचते, ती आधी मांडतो.
   कोणे एके काळी पंचमवेद म्हणून मान्यता पावलेले भरतमुनींचे 'नाट्यशास्त्र ' कालधारेबरोबर देशकाल परिस्थितीतील सर्वंकष अवनतीमुळे अप्रतिष्ठीत झाले. या वेदसाधकांना एका उपेक्षित उतरंडीच्या तळाशी उभे केले गेले. त्यांना अपंक्त्य ठरवले गेले. अशा अनुचित आणि विषम व्यवहाराला तोंड देत साधक साधना करीत राहिले. आणि त्यांतूनच विष्णुदास भावे , अण्णासाहेब किर्लोस्करांसारखे रंगसाधक प्रवाहाविरुद्ध पुढे सरकत राहिले. या विरुद्ध सर्वात आग्रही आणि प्रत्ययकारी कृतीयुक्त आवाज उठविला तो गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी. आपली गौरवास्पद संगीतकला पुनरपि सुप्रतिष्ठीत व्हावी यासाठी त्यांनी कलासंगीत हे आधुनिक शिक्षणप्रवाहाशी जोडले. विद्यालये स्थापन केली. देशभर संगीत-प्रचारक पाठविले. संगीताचे कला आणि शास्त्र हे दोन्ही पक्ष विविध विद्वतसभेत हट्टाने मांडले. त्यातून ही संगीतकला पुन्हा प्रतिष्ठीत केली. १९०१ या वर्षी कराची येथे पहिल्या गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून एका अर्थी या सर्व अभिक्रमाची परिपूर्ती झाली
थोडे विषयांतर वाटेल असा हा मुद्दा एवढ्याचसाठी मांडला की १९०२ मध्ये समाधिस्थ झालेल्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनकाळात संगीतकला साधनेच्या प्रतिष्ठेपासून दूरच होती. कदाचित म्हणूनही त्यांच्या समकालिनांनी त्यांच्या जीवनातील संगीतस्वर बुद्ध्याच थोडा दबका ठेवला असावा. त्यामुळेच  त्यांचे दिव्य,उदात्त विरागी जीवन संगीताच्या ग्रहणापासून मुक्त ठेवल्याचे समाधान त्यांनी मिळवले असावे.
  म्हणूनच स्वामीजींच्या जीवनाकडे कोणता तरी एक दृष्टीकोण निश्चित करून त्यांच्याकडे पाहणाऱ्या मंडळींपेक्षा एका सर्वस्वी निराळ्या व्यक्तीच्या संस्मरणानेच प्रत्यक्ष प्रतिपाद्य विषयाला आरंभ करतो. त्या व्यक्तीला त्यांचे मोठेपण ठाऊक होते पण त्याचे मनावर दडपण मात्र नव्हते. त्यामुळे सहजपणे आरपार पहात अनिवार आत्मीयता, प्रेम, कौतुक, वात्सल्य देणाऱ्या त्यांच्या मातोश्री भुवनेश्वरीदेवींचे 
पुढील संस्मरण पाहण्यासारखे आहे.      
हे वर्ष आहे १८९९. दिनांक १९ जून. पुढच्याच दिवशी ' गोवळकोंडा' या जलयानावरून स्वामीजी कोलकात्याहून आपल्या दुसऱ्या पश्चिमप्रवासाला निघणार होते. म्हणूनच त्यांना निरोप देण्यासाठीच त्यांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी अन्य आप्तांसह बेलूर मठात जमले होते. आत्मीय भेटी झाल्यावर सारे उपासना मंदिराच्या  प्रशस्त ओवरीवर गोळा झाले. स्वामीजींचे शिष्य आणि काही सहसाधकांपैकी कुणी कुणी भजने गात होते. भुवनेश्वरी देवींचे मात्र त्या भजनांत मन लागत नव्हते. त्या अस्वस्थ नजरेने आपल्या नोरेनकडे पाहत होत्या. दूरदेशीच्या प्रवासाला निघालेला नोरेन. त्याचेच रूप त्या डोळ्यात साठवून घेत होत्या. पण पापणी लवे आणि डोळ्यांपुढील दृश्य धूसर होई. त्या पुनःपुन्हा ते दृश्य साठवून ठेवण्याचा यत्न करीत होत्या. त्यांना त्यांच्या नोरेनची मुद्रा अंतर्यामी कोरून ठेवायची होती. जणू ते उमजूनच स्वामीजी स्वतःच समोर बैठकीवर स्थानापन्न झाले. त्यांनी सवयीनुसार तानपुरे मनासारखे जुळवून घेतले. असे त्यांना तानपुरे जुळवताना बघणे हा खूप खोल सांगीतिक अनुभव असे. पण आज हा भुवनेश्वरी देवींसाठी आत्मीय सुखानुभव होता. त्यांना नोरेनचे बालपण आठवत होते. नोरेनला मांडीवर घेऊन, पाळण्यात ठेवून जोज्विताना त्यांच्या मुखात गाणेच असे. त्यांच्या स्वरांच्या सोबतीतच नोरेन वाढत होता. आपल्या आईचे अवघे वात्सल्य तो स्वरांतून मनात साठवीत होता. त्यांच्या मांडीवर, पाळणाझोळीत त्या स्वरांच्या आंदोलनांतच त्याच्या पापण्या हळूहळू मिटत होत्या. पण स्वरांच्या अनसंधानाने त्याला आई दिसत होती, जाणवत होती. भुवनेश्वरी देवींचा आवाज अत्यंत गोड होता. नोरेनला जोजविताना वा अन्य काम करतानाही 'कृष्णजात्रे'तील कृष्णलीलेची पदे त्यांच्या मुखी असत. तत्कालीन वंगभूमीत 'कृष्णजात्रा' या कोणत्याही नेपथ्याच्या अवडंबरावाचून सादर होणाऱ्या या संगीतिकेतील पदांतून घरोघरी बाळकृष्ण नांदत असत.
मनासारखे तानपुरे जुळल्यावर स्वामीजींनी स्वर लावला. आणि त्याच क्षणी शिशुकालातील
नोरेनप्रमाणेच भुवनेश्वरी देवींनी आपले नेत्र मिटून घेतले. नोरेनच्या केवळ स्वरांतून त्या नोरेनला पाहू लागल्या. अनुभवू लागल्या. स्वामीजींनी थोडी मन्द्रातील आलापी केली. आणि आपल्या आईला प्रिय असलेली कालीमातेची आणि शिवस्तुतीची पदे ते रंगून जात म्हणू लागले. भुवनेश्वरी देवी मिटल्या लोचनांनीच ऐकत होत्या. तल्लीन होत कालीमाता,शिव आणि त्याहूनही अधिक त्या आपल्या नोरेनला अंतरात उतरवून घेऊ लागल्या. दोन-तीन पदे गायल्यावर नोरेन थांबेल अशा भयाने त्यांनी स्वतःच आणखी काही भजनांचा हट्ट धरला. स्वामीजी नव्हे आईचा नोरेनच पुढे गाऊ लागला. नोरेन गात होता …… आईच्या मनात अधिकाधिक उतरत होता,रुजत होता. घट्ट.
कवितेच्या ओळी आठवतात,
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा /
तू आर्त मला जो ऐकविलास अभंग // 
      स्वामीजींचा स्वर हेच जणू आता त्यांचे अस्तित्व झाले होते. उदईक जलयानाचे भोंगे वाजतील आणि सपसप पाणी कापत झपाट्याने ते दृष्टीआड होईल. स्वामीजीही दृष्टीआड होतील. त्या नंतर त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या या रात्रीच्या स्वरांची स्मृतीच त्यांचे अस्तित्व असेल. म्हणूनच भुवनेश्वरी देवींसमवेत अन्य आप्त आणि आश्रमियांनी या भजन-यामिनीचे आयोजन केले असावे.  
या प्रसंगातून हे सहजीच लक्षात येते की स्वामीजींचा गायनस्वर हे त्यांचे प्रतिरूप होते. व्यक्तीची ओळख त्याच्या देहस्वरूपाहून वेगळ्या घटकाद्वारे अशी आणि इतकी प्रत्ययकारी होण्यासाठी त्याचे त्या घटकातून व्यक्त होणे तितकेच प्रभावी असावे लागते.   
     तसे स्वामीजींचे होते. कारण त्यांच्या जीवनात स्वराला, संगीताला अद्वितीय स्थान होते.
तरूण नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांच्या प्रथम भेटीसाठीही नरेन्द्राचा गायनस्वर हेच एकमात्र कारण होते हेही इथे लक्षात घेण्यासारखे आहे. शेजारी सुरेंद्रनाथबाबूंच्या घरी श्री रामकृष्ण आले
असता नेहेमी भजने म्हणणारा अनुयायी अनुपस्थित असल्याने तिथे नरेंद्राला पाचारण करण्यात येते काय आणि त्याने गायलेल्या पदांनी परमहंसांना त्याची मनोमन खूण पटते काय …. सारेच विलक्षण!     तरुण नरेंद्र गात असतो,
   " मन चलो निज निकेतने / संसार बिदेशे , विदेशीर देशे /
                                भामो केनो कारणे.. मन चलो निज निकेतने //            
   श्री रामकृष्ण पहिल्या स्वरापासूनच तल्लिन होतात. दृष्टी आधी श्रुतीच त्यांना अंतरीची खूण सांगते. मनोमन ओळख पटत जाते. स्वरांतून सापडलेल्या या भावी अनमोल अनुचाराचे रूपही पहावे या भुकेनेच ते नेत्र उघडतात. ते नरेंद्राला आलोचन पाहून घेतात. पाहता पाहताच भावसमाधीत जातात. हे नरेन्द्राच्या मात्र ध्यानीमनी नसते. तो स्वानंदात गात असतो. सूरतमल्हाराचे सूर त्याचे त्यालाही भिजवून टाकीत असतात. तर रामकृष्णांची अवस्था काय सांगावी. ते स्वतःही खूपदा स्वरमग्नच असत. कालीमातेची कितीतरी भजने ते तदाकार होऊन गात असत. अमूर्त ईश्वराशी अमूर्त स्वरानेच संधान बांधता येते हे त्यांना उमगले होते. त्यांचा तो स्वानुभवच होता. पदाचे अंतरे संपविताना नरेंद्र पुनःपुन्हा 'निज निकेतने' गात होता, अयोध्यानाथ पाकडाशी या तत्कालीन प्रतिभावान वंगकवीचे ते शब्द, जणू नरेन्द्राच्या नव्या 'निज निकेतना' चे पुनःपुन्हा सूचन करीत होते. अमृतयोग असा की त्याचे भावी निकेतनच समोर श्रोतृवृन्दात जीवाचे कान करून त्याचा स्वरविलास ऐकत होते.
पथिकाला नेण्यासाठी जणू प्रत्यक्ष गंतव्यच तिथे आले होते. एकतालात बांधलेल्या त्या पदाने नरेंद्र-रामकृष्णांचे असे भावऐक्य साधले होते. 'मन चलो ' असा आरोही पुकारा करीत नरेंद्राने 'निज निकेतने' वर ठेहराव घेत संतोषाने समोर पाहिले. सम सापडल्यासारखा तो रामकृष्णांकडे पहातच राहिला. रामकृष्णांनी आणखी पुढे गाण्यासाठी आर्जवी संकेत केला. तीच आज्ञा मानून त्याने मुलतानीत थोडी आलापी करीत नरेंद्र पुन्हा गाऊ लागला : 

      " जाबे कि हे दिन आमार निकले चलिबे / आछिनाथ, दिवानिशि आशापथ निरखिये //
…. सरती हे दिस परी, आशा सरणार नाही । निशिदिन अनिमिष , आशा वाटुलिते पाही ॥
      येशील ना ,देशील ना , दर्शन या पथावर । अथक प्रतिक्षा माझी, निष्फळ ना ठरणार  ॥
   नरेंद्र गाताना दिसत होता पण प्रत्यक्षात हे रामकृष्णांच्याच मनीचे भाव नव्हते काय ? प्रथम दर्शनातच या हृदयीचे त्या हृदयी जणू भावांतर झाले होते. आणि याचे माध्यम होते नरेन्द्राचा स्वर …. संगीत ! नरेंद्र आता समोर बसलेल्या रामकृष्णांच्या मुखाकडे पाहतच गात होता. त्यांच्याच आर्जवाने …. आज्ञेने. त्यांचेच भाव दर्शविणारे हे बेचाराम चट्टोपाध्यायांचे हे रसार्द्र पद ! पुनश्च एकतालाच्या आवर्तनांतून पद रंगत गेले.
    नरेंद्राने पहिल्या भेटीत म्हटलेली ही दोन्ही पदे एकतालातच असावीत हा केवळ योगायोग होता की काही कालसंकेत
    या प्रथम भेटीनंतरचा आसयुक्त प्रवास स्वामीजींच्या सर्वच चरित्रकारांनी सविस्तर टिपून ठेवला आहे. पण हे पूर्वसंगीत मात्र …? पुढच्या संपूर्ण नाट्यप्रयोगाशी अधिक नाते असलेल्या नाटकाच्या आरंभी सादर होणाऱ्या नांदी सारखे नांदी इतकेच मोलाचे असूनही काहीसे उपेक्षिले गेले.    
स्वामीजींच्या गुरुदेवांनापरमहंसांना त्यांच्या स्वरांतून जसे आत्मतत्व जाणवले , स्पर्शाले तसेच उत्तरकाळात त्यांच्या शिष्यसंप्रदायालाही जाणवले हे विशेष वाटते. या कालक्रमातील वैशिष्ट्यपूर्ण बाब ही वाटते की नरेंद्राने स्वतःचे नाव टाकले. साधारण प्रापंचिक दायीत्वे टाकली. आप्तांचे सदन टाकून 'निज-निकेतनाचा' आश्रय घेतला. जनरीतीची वसने टाकून विरागी वेष परिधान केला. स्वतःमध्ये असे आमूलाग्र आणि अंतर्बाह्य परिवर्तन  आणीत असता आपला स्वर , आपले संगीत मात्र निजखुणेसारखे जपले. एवढेच नाही तर स्वर हेच आत्मप्रकटनाचे विशुद्ध माध्यम म्हणून वेळोवेळी उपयोगात आणले. त्याची साक्ष पहाण्यासाठी आपण भगिनी निवेदितांकडे जाऊ.
स्वामीजींची परमशिष्या हीच निवेदितांची सर्वज्ञात ओळख आहे. मूलतः पाश्चात्य …. आयर्लंड या 
देशात वाढलेली आणि पुढे बुद्धीपूर्वक स्वामीजींचे शिष्यत्व स्वीकारलेल्या निवेदितांनी आपली लहानमोठी संस्मरणे लिहून ठेवली आहेत. गुरूंसमवेत त्यांना उत्तर भारतात परिभ्रमण करण्याची संधी मिळाली. या काळातील स्मरणे त्यांनी टिपून ठेवली आहेत. ती स्मरणे यासाठी महत्वाची आहेत की यांत रेखाटलेले स्वामीजी रूढ प्रतिमेहून काहीसे मुक्त आहेत. मोकळे आहेत. इथे सतत अवती भोवती सांप्रदायिकांचा गोतावळा नाही, निव्वळ भक्तीयुक्त आदराने भारावलेल्या नजरांचे वेढे नाहीत, दिनरातीचा आखीव काटेकोर दिनक्रम नाही, व्याख्यान-भ्रमंतीसारखी मुद्दाम आमंत्रिलेल्या मान्यवरांची मांदियाळी नाही. स्वामीजींसोबात त्यांचे काही गुरुबंधू, शिष्य, काही युरोपीय अतिथी आणि शिष्य ज्यांत धीरा माता, ज्या आणि भगिनी निवेदितांचा समावेश आहे. ते वर्ष आहे १८९८. बेलूरच्या गंगातीराहून निघालेला हा जथा पुढे नैनिताल, अल्मोरा आणि काश्मिरात विहार करतो. लौकिक बंधने झुगारलेल्या या मुक्त मनस्वी योग्याची सारी भाववृत्ती तिथे निसर्ग सान्निध्यात बहरत जाते.
भगिनींची या परिभ्रमणातील निरीक्षणे अतिशय वेगळी आहेत. स्वामीजींच्या लोकस्वीकृत, उदात्त गंभीर प्रतिमेच्या मागील अम्लान चैतन्याचे लोभस दर्शन त्यांत होते. आणि या चैतन्याची अनुभूती देणारे माध्यम अर्थातच त्यांचे संगीत आहे.
     बेलूरहून निघण्याआधी काही शिष्यांचा दीक्षाविधी पार पडला. त्यानंतर स्वामीजी सर्वांना घेऊन माडीवर गेले. आणि त्यांनी अंगाला विभूती, कानात अस्थींची कर्णभूषणे, माथ्यावर जातासाम्भार असे प्रत्यक्ष शिवरूप धारण केले. आणि नादब्रह्माच्या जनकाच्या या रूपातच नादसमाधी लावली. जवळपास तासभर साथसांगत घेऊन स्वामीजी भारतीय शास्त्रोक्त संगीत आळवीत होते.
या दिवसात ते गंगातीरावरील कुटीतच निवास करीत. अनेक माणसे त्यांना भेटायला येत. चर्चा झडत. स्वामीजी मुक्तपणे त्यांत सहभागी होत. एकदा तर पर्शियन काव्यावर चाललेल्या चर्चेत स्वामीजींनी काही पर्शियन काव्यपंक्ती गाउन दाखविल्या. नंतरच्या गप्पांत ते म्हणाले की साहित्याचा ,त्यातील प्रेमगीतांचाही आस्वाद घेता यायला हवा. पुढचे प्रतिपादन तर त्याहून लक्षणीय होते. सर्वंकष जीवननिष्ठांचे महत्व सांगत ते म्हणाले , " राष्ट्राच्या एकत्वासाठी समान प्रेमविषय आणि द्वेषविषयाची नितांत आवश्यकता असते."                 .                                                                            काही जणांना आध्यात्मिक भावनावेगाने दुर्बळ होताना त्यांनी पाहिले होते. पण ते त्यातून आनंदबोधाचा प्रत्यय देत असत. त्यासाठी ते वृंदावनातील कृष्णलीलांची कवने म्हणून त्यातून भक्तीयुक्त, ज्ञानयुक्त आनंदाची लयलूट करीत असत. अशा वेळी पारंपरिक पदावलींसोबत त्यांचे नाटककार मित्र बाबू गिरीशचंद्र घोषांची नाट्यपदेही रंगून म्हणत.
   अशी कधी कविता, कधी पदावली, नाट्यगीते तर कधी स्तोत्रमंत्रही त्यातील स्वराघातासह स्वामीजी रंगून जाउन म्हणत. अल्मोरा येथून काश्मीरकडे जाताना काठगोदामाच्या निवासात स्वामीजी एका सरोवराच्या काठी उंचवट्यावर बसून उपनिषदातील रुद्रोपासानेचे मंत्र गात बसले. गाताना बृहदारण्य उपनिषदातील 'असतो मा सद्गमय …. ' या मंत्रातील चौथ्या चरणावर ते पुन्हा पुन्हा रेंगाळले. त्या चरणाचे शब्द होते ' अविरानिम एधि …'. तिथे गाता गाताच त्यांना त्या चरणावर भाष्य करावेसे वाटले. स्वामीजी अर्थाचे वलय उजळत होते. ' तू जसा आहेस, जसा स्वतःमध्ये प्रकटतोस, तसाच आमच्यातूनही प्रकट हो.… ' असा काहीसा अर्थ उमलून येत गेला. त्या निराकाराच्या, निर्गुणाच्या उपासनेत तो जसा आहे तसा आपल्यातून प्रकट व्हावा अशी आकांक्षा आमच्या त्या मंत्रदृष्ट्या ऋषी परंपरेने धरली होती. त्याच परंपरेचे आधुनिक वाहक होते स्वामीजी. त्या चैतन्याने जसे आहे तसे प्रकट व्हावे असे म्हणत रेंगाळताना ते चैतन्य म्हणजेच स्वर असाच तर अन्वय नसेल? स्वर हाही त्या चैतन्यासारखाच निर्गुण, निराकार,अमूर्त असतो. पण त्याची प्रचीती जाणवत असते. त्याचे कुणामधूनही स्वस्वरूपात प्रकट होणे सहज संभवनीय असते. स्वामीजींचा स्वराकडे पाहण्याचा भावच इथे व्यक्त होतो असे म्हणावेसे वाटते.
     त्याच दिवशी सायंकाळी स्वामीजींनी ऋग्वेदातील ' मधुवाता ऋतायते, मधक्षरन्ति सिन्धवः ' हे मधुसूक्त स्वरानुबंधासह ऐकविले. म्हणता म्हणताच ते ध्यानावस्थेत गेले. अखेरचा चरण ' माध्वीर्गावो भवन्तु नः । ओम मधुः  ओम मधुः  ओम मधुः ॥ म्हणता म्हणता त्यांचा स्वर मंदावला. जणू अनाहताचा स्पर्शच ते अनुभवीत होते. अनाहत हा स्वयंभू स्वर असतो. तो आघाताने निर्माण केला जात नाही. म्हणूनच तो साधारण स्वरांसारखा कानांना ऐकू येत नाही तर तो अंतरात जाणवतो.
काही काळ त्या अनाहताच्या नादसमाधीत गेला. आणि स्वामीजी तीच अनुभूती जणू शब्दांकित      
करीत होते.
   सर्व आनंदमय आहे आनंदमय आहे आनंदमय आहे ! स्वामीजींचा स्वर त्याच आनंदक्षणांत भिजून सूरदासाचे पद गाऊ लागला.
  " प्रभू मोरे अवगुन चित न धरो / समदर्शी हैं नाम तिहारे , चाहे तो पार करो //
   नादानुसंधानाने जणू चैतन्याचीच प्रत्यक्ष अनुभूती झालेले स्वामीजी स्वरांच्या विशुद्ध सहवासाने रोमांचित होत गात होते. स्वरांच्या प्रस्तुतीसाठी, साधनेसाठी उपयोगात आणलेले शरीर, मन, शुद्ध करून घ्यावे अशी जणू त्या स्वरांचीच स्वामीजी विनवणी करीत होते.
   सूरदासांच्या या आर्त विनवणी करणाऱ्या पदाचा स्वामीजींच्या जीवनात एक विशेष संदर्भ होता.
स्वामीजींच्या  पहिल्याच भारत परिक्रमेत खेतरीच्या महाराजांच्या दरबारातील त्या प्रसंगाचे स्मरण करायला हवे. खेतरीच्या महाराजांनी एका संध्याकाळी एका नर्तकीच्या नृत्य-गायनाचा ठरविला. अन्य मान्यवरांसह स्वामीजींना  त्यांनी निमंत्रण दिले. पण वैराग्य धारण केलेल्या संन्याशाने असे नर्तकीचे नाच-गाणे बघायला जाणे उचित नाही असे सांगून स्वामीजींनी तिथे जाणे टाळले. तर तिथे नर्तकीला मात्र प्रत्यक्ष स्वामीजी येणार याचेच अप्रूप वाटत होते. त्यासाठीच तिने सुरदासांचे हेच पद निवडले होते. दुरून ये शब्द आणि सूर ऐकून स्वामीजींना पश्चात्ताप होतो आणि ते आपला प्रमाद सविनय मान्य करून तिचे नृत्य पहायला जातात.
    स्वामीजींमध्ये हे परिवर्तन सूरदासांच्या शब्दांनी तर घडवलेच पण स्वरांनीही घडवून आणले. बहुतेक सर्वच चरित्रकार हा प्रसंग लिहिला आहे पण तो स्वामीजींच्या समदर्शित्वाचा गौरव करण्यासाठी. पण या प्रसंगात त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि हळुवार भाववृत्तीचा परिचय होतो. संगीताच्या स्वरांचे आवाहन त्यांच्या मनाला कसे स्पर्श करीत असे याचेही दर्शन इथे घडते.
निवेदितांच्या या वृत्तांतात आणखीही काही मार्मिक प्रसंगांचे वर्णन वाचायला मिळते. पंजाबात प्रवेशतानाच्या एका प्रसंगात ते चरख्यावर सूत कातताना निर्माण होणारी ध्वनिकंपने दाखवीत ........   
त्याचे 'सोsहम सोsहम ' असे गुंजन ध्यानात आणून देतात. हा नाद ऐकत ऐकतच तिथे काम करीत असलेल्या मुली गुंग होऊन जात. हे असे नादचिंतन करण्यासाठी आधी कान तयार असायला हवा. आणि तसा तो स्वामीजींचा निश्चित होता याची साक्ष या प्रसंगातून सहजच मिळते.       
याच प्रदेशातून चालताना स्वामीजींना असाच स्वरसाक्षात्कार झाल्याची माहितीही निवेदितांनी दिली आहे. एका संध्याकाळी तिथे नदीकाठावर एक वृद् वेदऋचा गात बसलेला असतो.स्वामीजी ते ऐकतच जागे होतात. आणि उठता क्षणीच तेच युगानुयुगे गुंजत राहिलेले अविनाशी स्वर गुणगुणू लागतात. त्या प्रदीर्घ काळाचे ते अंतर स्वरांतून क्षणार्धात सहज सांधले जाते. याच स्वरसोपानाच्या द्वारे आपल्या प्राचीन गौरवशाली युगाशी आपले अतूट नाते आहे हे स्वामीजींच्या प्रत्ययास येते. स्वामीजी ही आठवण सांगत म्हणतात , " यापूर्वी शंकराचार्यांनाही हाच साक्षात्कार झाला असणार. याच नादसूत्राने त्यांनाही वेदकाळाशी जोडून टाकले असणार."
    पुढे काश्मिरात श्रीनगरातील आपल्या वास्तव्यात त्यांनी एक अत्यंत महत्वाची कविता लिहिली. त्याला निमित्त होते रामकृष्ण संघाच्या मुखपत्राचे, 'प्रबुद्ध भारता'चे मद्रास येथे नियोजित स्थलांतर ! या प्रसंगी स्वामीजींनी त्या मासिक पत्रिकेला एक पत्र लिहीले. 
   ती एक कविता होती…" प्रबुद्ध भारतास !"          
   प्रबुद्ध भारताला म्हणजेच भारतातील जाणत्या समूहाला जागृतीचे आवाहन करीत या कवितेद्वारे त्याला कर्मप्रवण करणे हेच या कवितेचे मुख्य प्रयोजन आहे. तो कृतीशील होताच त्याच्या कृतीचा आविष्कार कसा असेल ते सांगताना स्वामीजी पुन्हा स्वरांचेच रूपक योजतात. स्वामीजी म्हणतात,
   " तुझे कर्म ईच्छा तया  एवढीच  / नव्यानेही  आश्चर्यकारी  घडोच //
  स्वरांते तुझ्या स्वर्धुनी ऐसी लाभो/ अमर्त्या तिच्या गानी तो एक होवो //"
   स्वामीजींना राष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात असे कर्तृत्वाचे संगीत फुलवायचे आहे. त्यासाठी कर्माची, कृतीचीच गाणी होवोत आणि त्याचेच गुंजन सर्वत्र भरून राहो. त्यासाठी त्या कर्मगीतांना अमर्त्य अशी स्वरावली, स्वरधुनी लाभावी. इथे स्वामीजींची अशी श्रद्धा आहे की जागरण,त्याचा विस्तार आणि त्यातून उमललेली कर्मप्रेरणा या त्रिदलाच्या सर्वव्यापी स्वीकारासाठी त्याला संगीताचा संजीवक स्पर्शच हवा कारण स्वरच समूहमनाला प्रेरक ठरतो. हे सर्व पाहता स्वामीजींच्या जीवनप्रेरणांमागेही त्यांच्या अंतर्यामी अविरत अविचल गुंजणारा त्यांचा अन्तःस्वरच असेल असे म्हणणे संयुक्तीतच नाही का?
    काश्मिरभ्रमणातील निवेदितांनी टिपलेली एक आठवण हाच तर्कसंगतीचा धागा पुढे नेताना दिसेल.
िथे एका सरोवरात एका लहानश्या नावेतून विहार करताना स्वामीजी सतत गात होते. ती सारी कवने होती रामप्रसादांची. त्यांची मातृवन्दनेची कवने. ज्यांत कवी आपल्या आईशी संवाद करताना म्हणतो:  
      " ऐकते आहेस ना तू हाक आई   /  दूर मी तुजपासुनी, परि दूर नाही  //
   तू कधी रागावुनी दिधलीस शिक्षा / कुशित तूही मजसवे रडलीस आई /
   हे कसे आक्रीत तू मज मारताना /  ना पळालो, बिलगलो मी म्हणत 's ' //
   दूर मी तुज मूर्त ना पाहू शके गे / अंतरातूनी तू जरा ढळलीस नाही //
   म्हणून ऐसा एकता बसल्यावरी मी / हाक या ओठांवरी ये 'आई !आई !'// "

    हे गाताना स्वामीजी त्या लहानशा नावेतही काहीसे एकटेच झाले होते. सोबत एक अन्नम शिष्य बसलेला. सरोवराचं संथ पाणी, वल्ह्याच्या हालचालींपुरतेच हलणारे. स्वामीजीनच्या दृष्टीसमोर तेव्हा त्यांचा पहिला विदेश प्रवास आला असेल का? ते दुरावणं , दुखावणं त्यांच्या मनांत साचून राहीलं होतं का? आईपासून तर ते श्रीरामकृष्णांच्या पथावर चालू लागले तेव्हाच दुरावू लागले होते. पण
मातृभूमीपासून दुरावा त्याच प्रवासाने सोसायला लावला. निघताना तो इतका प्रदीर्घ असेल असे
वाटलेच नव्हते पण बघता बघता पाच वर्षे सरून गेली. दुराव्याने भरून गेली. जाताना ते एकटेच होते पण तिथे पोहोचल्यावर तर साऱे पश्चिमी जग त्यांच्या भोवती मोहित होऊन फिरत होते. तेव्हाचे ते अव्यक्त, मूक राहिलेले एकटेपण तर या गीतातून प्रकट होत नव्हतं ?
    तसंच असावं.आणि याही चित्तवृत्तीच्या प्रकटनासाठी पुन्हा एकदा त्यांचा स्वरच सहज माध्यम झाला.
    या अशा वेगळ्या विवेकानंदांची चित्तचित्रे टिपणाऱ्या भगिनी निवेदितांचे ऋण शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
   गतवर्षी स्वामीजींची संगीतसाधना,अभ्यास या विषयी 'चार शब्द ' च्या दिवाळी अंकात लिहिले होते. या लेखाच्या निमित्ताने आई आणि शिष्या अशा दोन वेगवेगळ्या डोळ्यांना दिसलेले विवेकानंद पुन्हा एकदा पाहिले आणि संन्यस्त वसनांच्या आरपार असलेले विशुद्ध स्वराकार स्वामी अनुभवले.
मा. दीनानाथ मंगेशकर तानपुऱ्याला साधुपुरुष म्हणत. त्यांच्या कन्या गानसरस्वती लतादीदींच्या स्वरोपासना मंदिरातील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. तिथे मा.दीनानाथांची लहानशी प्रतिमा, शेजारी गवसणीत ठेवलेला तानपुरा म्हणजेच 'साधुपुरूष' आणि मधोमध ठेवलेली स्वामी विवेकानंदांची तुलनेने मोठी प्रतिमा चकीत होत पाहिली होती. साक्षात स्वरदेवतेच्या स्वरमंदिरात स्वामीजी पाहून आनंदासह आश्चर्यच वाटलं होतं. थोडे अधिक वाटलं होतं.
    पण स्वामीजींची वरील दोन दर्शने पाहिल्यावर ते स्वाभाविक वाटलं. भुवनेश्वरी देवी आणि भगिनी निवेदितांची संस्मरणे वाचल्यावर हा साधुपुरूष गवसणीतून बाहेर आला आणि स्वरात उत्तम जुळवलेल्या तानपुऱ्यासारखा गुंजन करू लागला. आता तेच गुंजन ऐकतो आहे.

========================================================================
         

1 comment: