Saturday, 22 April 2017

                                                     || मातृभाषा दिन ||


आज २१ फेब्रुवारी ! या लहानशा महिन्यात एका लहानश्या देशातील नागरिक आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होते. या लढ्यात एक महत्वपूर्ण निजखूण त्यांचे बलस्थान होत होती. ती निजखूण होती....भाषा ! स्वभाषा !! मातृभाषा !!!अस्तित्वाला अर्थ देणारी ही निजखूण जपण्यासाठी प्राणही पणाला लावण्याचे प्रेरणाबळ त्या नागरिकांना मिळाले.
एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या विभाजनाची दुःखद घटना घडली आणि मुख्य किंवा मोठ्या भूभागापासून दुरावलेल्या भूभागातील नागरिकांचे दुःखपर्व सुरू झाले. दोन्ही दिशांना...पूर्व आणि पश्चिम !
विभाजनपूर्व भारतात विशालतेमुळे वैविध्य होतं .... भरपूर होतं. पण तुटलेपण नव्हतं. पोरकेपण नव्हतं. एक साहजिक, आंतरिक झुळझुळणारा एकात्मतेचा झरा होता. तोच सर्वांना वैविध्यातही दूरत्वाची झळ लागू देत नव्हता. भाषा, भूषा, प्रथा, पर्व, आहार, विहार अशा अनेकांगानी हे वैविध्य दृश्यमान होत होते पण त्यातही बहुरंगी इंद्रधनुष्याची मनोज्ञ रम्यताच जाणवत होती. एकाधिक स्वरांची आस एकमेकांत गुंफून श्रुतिसुंदर गीतधून गुंजत रहावी तसेच आंतरगान इथे दरवळत राहिले होते.
भारतावर गिद्धनजर ठेवलेल्या आक्रमकांनी, परक्या राज्यकर्त्यांनी, त्यांनीच उभारलेल्या ज्ञानपोईवर आपली तृष्णा भागविलेल्या परपुष्ट पंडितांनी ही बहुरंगी रांगोळी विस्कटून टाकण्याची, ही गीतधून उसवून टाकण्याची पराकाष्ठा शतकानुशतके केली. दंड आणि दाम अशा दोन्हीही आयुधांनी एकात्म भारताचा शिल्पभेद मात्र अयशस्वी होत होता. शतकानुशतके जे साधता आले नाही ते असंभाव्य ठरलेले दुःस्वप्न राष्ट्रविभाजनाच्या कुठाराघाताने साकार करण्याचा संतापजनक प्रयत्न झाला. विभाजनाने दुरावलेला पूर्व आणि पश्चिमेकडील भूभाग पाकिस्तान या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला. केवळ देशनाम बदलून देशातील माणसे, त्यांची मने बदलता येत नाहीत. खूप खोल रूजलेल्या निजखूणा घेऊनच तेथील समाज जगत होता. वेगळा देश मिळवूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत नव्हती. तळ नसलेल्या भांड्यासारखे विभाजनाने मिळविलेले राज्य, सत्ता रितेच राहिलेले त्या राज्यकर्त्यांना सहन होत नव्हते. मूळातच नसलेलं ऐक्य कधीच निर्माण झालं नाही. आणि त्यातूनच पश्चिम पाकिस्तानाचे पूर्व पाकिस्तानावर अत्याचार पर्व सुरु झालं. ऐक्य तर नव्हतंच पण आता वैर सुरू झालं. आणि त्या दहशतीचा सामना करणाऱ्या समाजाला दृढतेने उभं रहायचं बळ दिलं भाषेने...मातृभाषेने. स्वाभाषेच्या सूत्राने समाज संघटित झाला. बांगला भाषा संघटित अस्मितेच्या उद्गाराचे केवळ साधन नाही तर प्रेरणा बनली, चेतना बनली. दमनचक्र अधिक भेदक, भेसूर झालं. ते झेलणारं समाजमन आता एकात्म केलं होतं, मोल मोजण्यासाठी सिद्ध केलं होतं. वर्ष १९५२. विभाजनाला उणीपुरी पाच वर्षे झाली होती. आणि या वर्षी दि. २१ फेब्रुवारीला ढाक्यात विशाल जनमेदिनी एकवटून स्वभाषेचा उद्घोष करून आपले अस्तित्व प्रदर्शित करीत होती. हिंस्र सत्ताधीशांच्या दमनाला आव्हान देण्याचे बळ मातृभाषेने दिले होते. आबालवृद्ध नागरिक पुरूष आणि 'बांग्लार मायेरा, मेयेरा सकलई मुक्तियोद्धा' असे गर्जत निघालेल्या मायभाषेच्या लेकीबाळींच्या याच सातत्यपूर्ण लढ्याला पुढे मुक्तीवाहिनीचे संघटित विजिगीषु स्वरूप लाभले आणि उज्ज्वल यशही. १९७१ मध्ये मातृभाषेने मुक्तीचा धवल किरीट या भूमीच्या मस्तकी चढविला.
समाजधारणेची चेतना बनलेल्या स्वभाषा..मातृभाषा या अनन्यसाधारण घटकाची दखल युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा करीत घेतली. या दिवशी २१ फेब्रुवारी या दिवसाला 'जागतिक मातृभाषा दिन' असा सन्मान प्रदान करण्यात आला. पुढे २००८ हे 'आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष' या नावाने साजरे करण्यात आले. त्या वर्षी पुन्हा एकदा २१ फेब्रुवारी या 'जागतिक मातृभाषा दिना'चे महत्त्व उच्चरवाने सांगितले गेले आणि आता प्रतिवर्षी मातृभाषेचे ऋण व्यक्त करण्यासाठी, तिची उपेक्षा थांबविण्यासाठी आणि तिचा यथोचित सन्मान करण्याची आकांक्षा जागविण्यासाठी या दिवशी मातृभाषेचा महन्मंगल जागर विश्वभर करण्यात येतो.
आज या निमित्ताने आपल्या मायमराठीचा आपण भाषाबांधव एकस्वराने जयजयकार करूया. सर्वच व्यवहारात तिची संगतसोबत घेऊया. तिच्या सावलीत आव्हानांची उन्हे सोसण्याचे बळ मिळवूया.
- प्रमोद वसंत बापट
[ २१ फेब्रुवारी १९५२ च्या लढ्यातील हुतात्म्यांचे ढाका विद्यापीठातील ढाका मेडिकल कॉलेजच्या आवारात उभे असलेले स्मारक ...शहिद मीनार ! ]

दि. २१ फेब्रुवारी, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]


                                               || शरदभाऊ जोशींचा जनसंवाद  ||


आज संध्याकाळ एका सामाजिक आनंदाने रंगून गेली. निमित्त होते एका सहनिवासातील कुटुंब संमेलनाचे. आपल्या नागरी जीवनाचे वर्णन छोट्या, विभक्त कुटुंबांच्या उल्लेखावाचून पूर्ण होत नाही. आणि खरंच शेजारी पाजारी सर्वत्रच आपण दोन वा तीन, अगदी क्वचित चार-पाच माणसांची घरं पाहत असतो. ही लहान कुटुंब आणखी लघुत्तम होत जातानाही पाहतो. एका छताखाली जगणारी एकेकटी माणसं. स्नेह, सहवास, संवाद विरहित एकमेका भोवती वावरणारी माणसं. आबालवृद्ध. स्त्रिया. पुरूष. मुलं. मुली. खरंतर मूल. एकुलतं.
पण नागरी जीवनातील हेही सहवैशिष्ट्य आहे की अशी लहानखुरी कुटुंबं इथे या शहरात गर्दी करून राहतात. आणि कधी औपचारिकता म्हणून पण खूपदा आंतरिक आवश्यकता म्हणून.
ही दोन्ही कारणे घेऊन आज सकाळी धुलीवंदनात रंगून झाल्यावर संध्याकाळी उत्तर मुंबईतील बोरिवली पश्चिमेस शिंपोलीत बद्रीनाथ सहकारी गृह संस्थेतील बासष्ट कुटुंबे एकत्र आली. खेळ, लहान मुलांची नाच, गाणी असे नेहमीचे यशस्वी कार्यक्रम सुरू होते. पहिल्या रांगेतून या सहनिवासाचा नागरिक नसलेला एक अतिथी पाहत होता. आत्मीयतेने. आस्थेने. आणि तिसऱ्या रांगेतला मी ते पाहत होतो काहीशा निमूट कंटाळ्याने. अतिथीच्या शेजारच्या आसनावरून कदाचित दिलीप पैही तसेच. आम्ही इथे राहणाऱ्या दीपक शहा या स्वयंसेवक-कार्यकर्त्याच्या नियोजनाने इथे उपस्थित होतो. अर्धा पाऊण तास स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पुढील कार्यक्रमाची सूचना सांगण्यासाठी दीपक शहांनी ध्वनिवर्धक हाती घेऊन आजच्या त्या कार्यक्रमातील अतिथींना पुढे व्यासपीठ सदृश आसनाकडे बोलावले. दिलीपजी आणि माझीही रवानगी त्यांच्या आजूबाजूच्या आसनांवर झाली. दीपक परिचय करून देऊ लागला ......
"आजनु आपडु अतिथी, जो शिक्षा पूर्ण करीने पुरा वख्त समाजनु..समाजमाटे काम करे छे. आ महेमाननु नाम छे, शरदभाई शंकर जोशी ! आज आपडी सामे आ वात करसे..आपडी. आपडे परिवारनी."
आपल्या पोराबाळांच्या नाचगाण्यांनंतर समोर बसलेली मंडळी आपल्या शरदभाऊंचं बोलणं कसं आणि किती स्वीकारतील या प्रश्नानं मी अस्वस्थ ..अवाक्.
पण..... !! शरदभाऊ बोलू लागले आणि .... बघाच.
( शरदभाऊ जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात परिवार प्रबोधनाचे काम करणारे प्रमुख कार्यकर्ते आहेत. दिलीपजी पै कोकण प्रांत कार्यकर्ता आहेत तर याची अनुपम योजना करणारे दीपक शहा कोकण प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख आहेत. )
दि. १३ मार्च, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]

                                          ||  वा. ल. मंजूळ  : भेट ||

              पुण्यात बैठक आहे असं ऐकल्यावर प्रथमतः डोळ्यांसमोर येतात त्या दोन गोष्टी. पुस्तकं आणि चितळे. म्हणून पुण्यात उतरल्यावर या दोन ठीकाणीच भौनी करून पुढच्या प्रत्यक्ष कामांकडे निघणं होतं. बोरीवलीहून पहाटे साडेपाचच्या शिवनेरीत बसायचं ते थेट डेक्कनलाच उतरायचं. उतरून समोर उत्कर्ष प्रकाशनाच्या दुकानाबाहेर आधी आणि नंतर दुकानात पुस्तकं पहायची. बाहेरची बघून निवडून झाली की पायरी चढायची आणि आतले गठ्ठे उचलून पहायला लागायचे. मग प्रकाशन व्यवसायाचे धनी जोशीबुवा त्वरेने छोटं स्टूल पुढे सरकवतात आणि आपण संकोचून असू दे असं म्हटलं तरी बसायला लावतात. ( हे घडत असतं मु.पो.पुणे येथे बरं का..) जोशीबुवा आणि त्यांची पुस्तकं मग बसायलाच लावतात. आपण गठ्ठे मागेपुढे करत असतो आणि दुकानात कुणाकुणाची येजा सुरू असते. अधेमधे काही संदर्भ बोलण्यात आला तर जोशीबुवा गप्पाही मारतात.
परवा शनिवारी नित्यानुसार याच क्रमाने असंच घडत गेलं. आणि दुकानात शिरताशिरता कुणीतरी दूरध्वनीवर बोलताना म्हणालं, "मी मंजुळ !"
"मी मंजूळ !" हे ऐकताऐकता मनात गंमतीदार संभाषण सुरू झालं. वेगवेगळ्या आडनावांची माणसे हेच वाक्य बोलताना ऐकू येऊ लागली. "मी रागीट !", "मी लट्टू !", "मी उत्पात !".....वगैरे वगैरे. पण त्या कोलाहलातही मी गठ्ठ्यातून डोळे उचलून पाहू लागलो. एक पासष्टीचे... बेताच्या उंचीचे सद्गृहस्थ बोलत होते. त्याच संध्याकाळी साहित्य परिषदेच्या सभागृहात होऊ घातलेल्या एका कार्यक्रमाविषयी मंजूळकाका बोलत होते. ते संभाषण संपल्यावर त्यांनी त्या दुकानातल्या एका महिलेला "अरूणाला दे जोडून..." असे सांगितले. मी माझ्या मनाशी कधीच निश्चित केले होते की हे वा.ल. मंजूळ असावेत. काही नावांची अशी मक्तेदारी असते ..नाही...! पलुस्कर, हेडगेवार या नावाची आणि महिमा नसलेली माणसं कुणी पाह्यल्येत ? तसंच काहीसं 'मंजूळ'ही. मंजूळांविषयी मी वाचून होतो. ग्रंथपाल ! तेही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे. पुस्तकवेड्यांच्या जगात श्री.बा.जोशींच्या नंतर टिकेकर, शां. शं. रेगे यांच्या पंक्तीतले प्रेमादराचं नाव वा. ल. मंजूळ ! मी पुन्हा गठ्ठ्यात लक्ष घातलं. मागे मंजूळकाका आणि उत्कर्ष प्रकाशनाचे धनी सुधाकरराव जोशींच्या गप्पा सुरू होत्या. मध्येच मला मुंबईहून चंदू जोशी या मित्राने दूरध्वनीवर पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकींच्या निकालाचे वृत्त दिले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड मधील भाजपाची मुसंडी, पंजाबातील पिछेहाट आणि मणिपूर-गोव्यातील हेलकावे याविषयी आमचे बोलणे झाले. आमच्या संभाषणातील हेच टोक पकडून सुधाकररावांनी मला थोडं चिंतेनेच गोव्याचं काय होईल असे विचारले. मीही विश्वासाने सांगून टाकले...दक्षिण गोव्यातील जागांचे निकाल लागून गेले आहेत. त्यामुळे या पुढील निकाल भाजपाच्या पारड्यात दान टाकतील, त्यामुळे गोव्यातही भाजपाचेच शासन येणार. हे ऐकून जोशी-मंजूळ दोघेही खुशालले. माझी पुस्तकं निवडून झाली होती, मी गठ्ठा जोशीबुवांसमोर ठेवला. त्यात 'किर्लोस्कर कथा' भाग २ आणि ३ पाहून भाग १ही आहे की, असे म्हणून त्यांनी एका सहायकाला भाग १ आणायला पिटाळले. तो शोधाशोध करून घेऊन आला. पण तो भाग ४ होता. ते हिशेब जोडत होते त्या अवधीत मी मंजूळकाकांना आपण ग्रंथपाल होतात ना असे विचारून तेच वा.ल. याची खातरजमा करून घेतली. ते तेच होते. मग गप्पा सुरू झाल्या. तरूण अभ्यासकांची असलेली वानवा ते गंभीरपणे सांगत होते. आकलनशक्ती नव्हे तर भाषा-इतिहाससंशोधनकडे कुणाचा कलच नाही असं अंधारं उदास चित्र असल्याचे ते खेदाने सांगत होते. भांडारकर संस्थेसंबंधीच्या गेल्या काही वर्षांतील घटना...खरं तर दुर्घटनांचे उल्लेख झाले. तिथे असलेल्या हस्तलिखिते आणि जुन्या ग्रंथांच्या संगोपन, संरक्षणाची व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगून ते म्हणाले आता मुंबईतील 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील' ग्रंथसंपदेसाठी काहीतरी करायला हवे. त्यांना मी एशियाटिक सोसायटीला शासनाने याच कामासाठी पाच कोटी रूपयांचे अनुदान दिल्याचे सांगितले. ते ठाऊक असल्यानेच त्यांनी मुं.म.ग्रंथसंग्रहालयाचा उल्लेख केल्याचे म्हणाले. बोलताबोलता हा ग्रंथमाळी आजही ग्रंथ-हस्तलिखितांची उपवने जपत असल्याचे समजले. भांडारकरोत्तर निवृत्तीकाळात वृत्तीच्या वेडाने भारावून एका वेगळ्या संस्थेत त्यांनी दीड हजाराहून अधिक मौल्यवान हस्तलिखिते जमवली आहेत..जपली आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी व्यवस्था उभी करण्याची खटपट हा वृद्धयुवा करीत आहे. सोबत प्रदीर्घ ग्रंथसहवासाने त्यांचा हातही लिहिता आहे. संगोपनाबरोबरीने निर्मितीचे डोहळे लागलेल्या यांच्या हातून पंचवीसावर ग्रंथांचे लेखनही झाले आहे. त्या संध्याकाळी त्यांच्याच दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा होता. डॉ. सदानंद मोरे आणि अरूणा ढेरे अशा संपन्न मान्यवरांचे बोलणे होणार होते. त्याचीच निमंत्रणे, स्मरणे मंजूळकाका दूरध्वनीवरून करीत होते. अरूणाताईंशी बोलताना ते म्हणाले होते, "अगं, आधी निश्चिती घेऊन कार्यक्रम करीत असलो तरीही पुन्हा त्या दिवशी त्या त्या व्यक्तींना सहज स्मरण करणे हे काम करायला हवे, त्यात जिव्हाळा आणि दक्षता दोन्ही जपले जाते." सुधाकररावांनी मंजूळकाकांची दोन्ही नवी पुस्तकं आणि त्याचबरोबर आधीची काही पुस्तकं मला दाखविण्यासाठी आस्थेने मागवली. आणि हे असे लेखक आहेत म्हणून आम्ही आहोत असे अत्यंत अकृत्रिमतेने म्हणाले. त्यावर निरागसपणे हसत मंजूळकाका म्हणाले की, "अहो, असा मानसन्मान सोडा.. मानधनाचं तेवढं बघा प्रकाशकराव !" आणि मग खळखळून हसत सुटले. मग डोळे मिचकावून गंमत सांगू लागले. कुणाकुणा लेखकांबरोबर वीसपंचवीस वर्षांपूर्वी मधुकाकांना भेटायला जात. मधुकाका कुलकर्णी...! श्रीविद्या प्रकाशन या मातब्बर प्रकाशनगृहाचे धनी. मंजूळकाका सांगत होते. मधुकाका वरच्या माडीवर बसत. आणि खालून कुणा लेखकाची पैरवी लागताच मोठ्या आवाजात दूरध्वनीवर संभाषण सुरू करत. "अहो, पेपरचं बिल ना? होय होय करतोय व्यवस्था.. ती छापखान्याची बिलेही वाट पाहू देणार नाहीत. कसंबसं थोपवून धरलंय आजवर. पण बघू ....तुमची पेपरची बिलं लगेचच चुकती करतो. निश्चिंत रहा. आणि छान आहे पुढचंही पुस्तक...चालेल तेही." पायरीपायरीवर संभाषण ऐकत लेखकू तोवर वर मधुकाकांसमोर उपस्थित होत असे. मधुकाका ऐसपैस हसून स्वागत करीत. शेजारी बसवून घेत. आणि "काय कारण काढलं भेटीचं ?" असं विचारीत. पायरीपायरीने शहाणा झालेला लेखकू सहनशील हसत "काही नाही..अगदी असाच...इथे आलो होतो म्हणून सहज चढलो वर...."असे म्हणे आणि रितारिकामाच हसतहसत . .हलकेहलके पायउतार होई. गंमत सांगून मंजूळकाका बालसुलभ हसले. आणि सुधाकररावही त्यांत सामील झाले. 'श्री' आणि 'विद्ये'तील हा लपंडाव की डाव हा द्वंद्वसमास कधी, कसा सुटावा ? लेखक आणि प्रकाशक दोघेही सोसत सोसत समृद्ध होतात आणि वाचकांनाही समृद्ध करतात हे मात्र खरे.
 बाकीबाबांनी म्हटलं आहे,
"सोस तू माझ्या जीवा रे, सोसण्याचा सूर होतो |
सूर साधी ताल तेव्हा, भार त्याचा दूर होतो ||"
मला आता निघायला हवे होते. जोशी-मंजूळांनी प्रकाशन सोहळ्याचे मला पुन्हा निमंत्रण दिले. मी अर्थातच माझी असमर्थता सांगितली कारण मला रविवारच्या दिवसभराच्या बैठकीसाठी संध्याकाळीच नाशिककडे निघायचे होते. हातात पुस्तकगठ्ठा आणि मनांत मंजूळकाकांशी झालेली नवी ओळख अत्तरासारखी जपत..आनंदाने भोगत मी समोरच्या पायऱ्या उतरून पुलाखालून दुसऱ्या सुखाकडे...चितळे बंधूंकडे निघालो होतो.

दि. १५ मार्च, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]