Saturday 22 April 2017

                                                     || मातृभाषा दिन ||


आज २१ फेब्रुवारी ! या लहानशा महिन्यात एका लहानश्या देशातील नागरिक आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होते. या लढ्यात एक महत्वपूर्ण निजखूण त्यांचे बलस्थान होत होती. ती निजखूण होती....भाषा ! स्वभाषा !! मातृभाषा !!!अस्तित्वाला अर्थ देणारी ही निजखूण जपण्यासाठी प्राणही पणाला लावण्याचे प्रेरणाबळ त्या नागरिकांना मिळाले.
एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या विभाजनाची दुःखद घटना घडली आणि मुख्य किंवा मोठ्या भूभागापासून दुरावलेल्या भूभागातील नागरिकांचे दुःखपर्व सुरू झाले. दोन्ही दिशांना...पूर्व आणि पश्चिम !
विभाजनपूर्व भारतात विशालतेमुळे वैविध्य होतं .... भरपूर होतं. पण तुटलेपण नव्हतं. पोरकेपण नव्हतं. एक साहजिक, आंतरिक झुळझुळणारा एकात्मतेचा झरा होता. तोच सर्वांना वैविध्यातही दूरत्वाची झळ लागू देत नव्हता. भाषा, भूषा, प्रथा, पर्व, आहार, विहार अशा अनेकांगानी हे वैविध्य दृश्यमान होत होते पण त्यातही बहुरंगी इंद्रधनुष्याची मनोज्ञ रम्यताच जाणवत होती. एकाधिक स्वरांची आस एकमेकांत गुंफून श्रुतिसुंदर गीतधून गुंजत रहावी तसेच आंतरगान इथे दरवळत राहिले होते.
भारतावर गिद्धनजर ठेवलेल्या आक्रमकांनी, परक्या राज्यकर्त्यांनी, त्यांनीच उभारलेल्या ज्ञानपोईवर आपली तृष्णा भागविलेल्या परपुष्ट पंडितांनी ही बहुरंगी रांगोळी विस्कटून टाकण्याची, ही गीतधून उसवून टाकण्याची पराकाष्ठा शतकानुशतके केली. दंड आणि दाम अशा दोन्हीही आयुधांनी एकात्म भारताचा शिल्पभेद मात्र अयशस्वी होत होता. शतकानुशतके जे साधता आले नाही ते असंभाव्य ठरलेले दुःस्वप्न राष्ट्रविभाजनाच्या कुठाराघाताने साकार करण्याचा संतापजनक प्रयत्न झाला. विभाजनाने दुरावलेला पूर्व आणि पश्चिमेकडील भूभाग पाकिस्तान या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला. केवळ देशनाम बदलून देशातील माणसे, त्यांची मने बदलता येत नाहीत. खूप खोल रूजलेल्या निजखूणा घेऊनच तेथील समाज जगत होता. वेगळा देश मिळवूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत नव्हती. तळ नसलेल्या भांड्यासारखे विभाजनाने मिळविलेले राज्य, सत्ता रितेच राहिलेले त्या राज्यकर्त्यांना सहन होत नव्हते. मूळातच नसलेलं ऐक्य कधीच निर्माण झालं नाही. आणि त्यातूनच पश्चिम पाकिस्तानाचे पूर्व पाकिस्तानावर अत्याचार पर्व सुरु झालं. ऐक्य तर नव्हतंच पण आता वैर सुरू झालं. आणि त्या दहशतीचा सामना करणाऱ्या समाजाला दृढतेने उभं रहायचं बळ दिलं भाषेने...मातृभाषेने. स्वाभाषेच्या सूत्राने समाज संघटित झाला. बांगला भाषा संघटित अस्मितेच्या उद्गाराचे केवळ साधन नाही तर प्रेरणा बनली, चेतना बनली. दमनचक्र अधिक भेदक, भेसूर झालं. ते झेलणारं समाजमन आता एकात्म केलं होतं, मोल मोजण्यासाठी सिद्ध केलं होतं. वर्ष १९५२. विभाजनाला उणीपुरी पाच वर्षे झाली होती. आणि या वर्षी दि. २१ फेब्रुवारीला ढाक्यात विशाल जनमेदिनी एकवटून स्वभाषेचा उद्घोष करून आपले अस्तित्व प्रदर्शित करीत होती. हिंस्र सत्ताधीशांच्या दमनाला आव्हान देण्याचे बळ मातृभाषेने दिले होते. आबालवृद्ध नागरिक पुरूष आणि 'बांग्लार मायेरा, मेयेरा सकलई मुक्तियोद्धा' असे गर्जत निघालेल्या मायभाषेच्या लेकीबाळींच्या याच सातत्यपूर्ण लढ्याला पुढे मुक्तीवाहिनीचे संघटित विजिगीषु स्वरूप लाभले आणि उज्ज्वल यशही. १९७१ मध्ये मातृभाषेने मुक्तीचा धवल किरीट या भूमीच्या मस्तकी चढविला.
समाजधारणेची चेतना बनलेल्या स्वभाषा..मातृभाषा या अनन्यसाधारण घटकाची दखल युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ या दिवशी एक महत्वपूर्ण घोषणा करीत घेतली. या दिवशी २१ फेब्रुवारी या दिवसाला 'जागतिक मातृभाषा दिन' असा सन्मान प्रदान करण्यात आला. पुढे २००८ हे 'आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष' या नावाने साजरे करण्यात आले. त्या वर्षी पुन्हा एकदा २१ फेब्रुवारी या 'जागतिक मातृभाषा दिना'चे महत्त्व उच्चरवाने सांगितले गेले आणि आता प्रतिवर्षी मातृभाषेचे ऋण व्यक्त करण्यासाठी, तिची उपेक्षा थांबविण्यासाठी आणि तिचा यथोचित सन्मान करण्याची आकांक्षा जागविण्यासाठी या दिवशी मातृभाषेचा महन्मंगल जागर विश्वभर करण्यात येतो.
आज या निमित्ताने आपल्या मायमराठीचा आपण भाषाबांधव एकस्वराने जयजयकार करूया. सर्वच व्यवहारात तिची संगतसोबत घेऊया. तिच्या सावलीत आव्हानांची उन्हे सोसण्याचे बळ मिळवूया.
- प्रमोद वसंत बापट
[ २१ फेब्रुवारी १९५२ च्या लढ्यातील हुतात्म्यांचे ढाका विद्यापीठातील ढाका मेडिकल कॉलेजच्या आवारात उभे असलेले स्मारक ...शहिद मीनार ! ]

दि. २१ फेब्रुवारी, २०१७ ला फेसबुकावर केलेली नोंद ]

No comments:

Post a Comment