Tuesday, 15 July 2014



|| कलाकालिंदीतील कालिया || 

आज लोकसत्तेने पहिल्याच पानावर प्रकाशित केलेली बातमी संतापजनक आहेच पण चिंताजनक अधिक आहे. वासुदेव कामत या ज्येष्ठ चित्रकाराने काढलेल्या एका चित्राच्या विना अनुमती प्रती काढून त्यांची विक्री करण्यात आली.आणि हा अपराध झाकण्यासाठी त्या कलादुष्ट बदमाषाने केलेला दुसरा गुन्हा अधिक क्षोभजनक आहे.
वासुदेव कामतांनी आपल्या चित्रांनी कलाविश्वात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेआहे. आजवर विविध संकल्पना त्यांच्या प्रतिभावान रेषेने रूपबद्ध केल्या आहेत. छत्रपती शिवरायांचे जीवन हे सर्वसामान्यांबरोबरच सर्वच क्षेत्रातील प्रतिभावंतांनाही साद घालत असतं. त्यातूनच त्यांचा शिवरायांच्या चिरप्रेरक जीवनाचा सत्त्वशोध सुरू होतो. त्यातूनच कामतांची अनेक वैशिष्टयपूर्ण शिवचित्रे साकार झाली. त्यातील एक चित्र मुंबईतील म्हाडाच्या कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. 

शिवछत्रपींच्या या चित्राचे वेगळेपण सांगायलाच हवे. आजवर अनेक कलावंतांनी सिंहासनाधिष्टित राजांची चित्रे रेखाटली आहेत पण त्या चित्रांत थेट समोरून महाराज- मुद्रा चित्रित केलेली अभावानेच आढळते.
वरील उल्लेखिलेल्या बातमीतील वासुदेव कामतांचे चित्र तसं चित्रित केलेलं आहे.तेच त्याचे मौलिक वेगळेपण आहे.
बातमीतील कलेचा काळाबाजार मांडताना ते चित्र शिवरायांच्या समकालिन कुणा डच चित्रकाराने रेखाटल्याचे सांगत त्या बदमाषाने अधिक पैसे उकळले. त्याने चित्ररसिकांची घोर दिशाभूल केलीच पण चित्रकार कामतांच्या कलाश्रेयालाही हरताळ फासला.
एखाद्या कलावंताचे कलाश्रेय असे एखाद्या समकालिन कलादुष्ट बाजारबुणग्याने हिरावून 
घेण्याचा हीन प्रयत्न करावा हे अधिकच चिंतेचे वाटते.
केवळ कलावंतच नाही तर कलाविद्यार्थी, अध्यापक, प्रदर्शक, कलारसिक आणि या कला-कालिंदीवर आपले समाधान मिळविणारे सर्व अशा सर्वांचाच द्रोह या कालियाने केला आहे.त्याचे वेळीच मर्दन करणे न्यायाचे होईल.


कोण हा भामटा / घालितसे डाका/
सोकावला बोका / चोरीसाठी //

म्हणे चित्रकार / कुणी एक डच्चू /
देत थेट डच्चू / चित्रकारा //

चित्रकारा केले / श्रेयासि वंचित /
केले कलंकित / कलाविश्व //

दुष्कर्माने ऐशा /कलेच्या राऊळा /
बाजाराची कळा / ग्रासतसे //

विटे रंगपट / पांगुळते रेखा /
कलेसी विळखा / कालियाचा //

वासुदेवे केले / तेव्हा निर्दालन /
पुनश्च स्मरण / झाले आजि //

अलक्षित गड / खाने बळकावा /
तैसाची हा कावा / कालियाचा //

परि असंभव / क्षय कीर्तीचंद्रा /
सांगे शिवमुद्रा / समोरूनी //

03/07/2014



||आषाढाच्या प्रथम दिनी या ||

कोणा यक्षा बघुनी विरहाग्निमधे पोळताना |
शैलीं त्यांते विजनी विपिनी
प्रत्यही खंगताना ||

उत्कंठेने कनकप्रतिभा
जागुनी अंगभूत |
कालीदासा! कविकुलगुरो,
तू दिले मेघदूत ||

तप्तांची तू विकल ऐसी
दु:स्थिती पाहुनिया |
आषाढाच्या प्रथम तिथिला
मेघ देशी सहाय्या ||

तू मेघाचे मन वळविले
दूत होण्यासी तेव्हा |
पुन्हा आजि विनवुनी तया
भारती वर्षवावा ||

शब्दाधीशा! तुजसि कथितो
काम हे धार्ष्ट्य मोठे |
काव्ये ऐसा रुजुनी अससी
सख्यता खोल दाटे ||

आषाढाच्या प्रथम दिनीं या 
आठवोनी महत्ता |
आजी आम्ही रमवित जगू
मेघदूतात चित्ता ||

Photo: ||आषाढाच्या प्रथम दिनी या ||

कोणा यक्षा बघुनी विरहाग्निमधे पोळताना |
शैलीं त्यांते विजनी विपिनी 
प्रत्यही खंगताना ||

उत्कंठेने कनकप्रतिभा 
जागुनी अंगभूत |
कालीदासा! कविकुलगुरो, 
तू दिले मेघदूत ||

तप्तांची तू विकल ऐसी
दु:स्थिती पाहुनिया |
आषाढाच्या प्रथम तिथिला
मेघ देशी सहाय्या ||

तू मेघाचे मन वळविले 
दूत होण्यासी तेव्हा |
पुन्हा आजि विनवुनी तया 
भारती वर्षवावा ||

शब्दाधीशा! तुजसि कथितो 
काम हे धार्ष्ट्य मोठे |
काव्ये ऐसा रुजुनी अससी 
सख्यता  खोल दाटे ||

आषाढाच्या प्रथम दिनीं या आठवोनी महत्ता |
आजी आम्ही रमवित जगू 
मेघदूतात चित्ता || सोबतचे चित्र ज्येष्ठ वासुदेव कामत यांचे आहे .(या सप्ताहाच्या साप्ताहिक लोकप्रभेतील ते पानच इथे दिसते आहे ) 28/06/2014


                                          ।। गानयोगिनीचे जाणे : एक व्रतविराम ।।

परवा सोमवारी दि.२३ जूनला वांद्रयाच्या शारदा संगीत विद्यालयात गानयोगिनी पंडिता धोंडूताई कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी त्यांची शिष्या सौ. स्मिता भागवत बाईंच्या विषयी त्यांच्या स्वभावाला साजेसे साधंसुधं पण अगदी नेमकं बोलली.बाईंच्या ॠतुजा लाड, दीपिका भिडे आणि आदित्य खांडवे 
या तरूण शिष्यांचे स्मृतिधन्य गाणं झालं.याती भागवत आणि विनोद पडगे या तरूणांची साथसंगतही अनुरूप होती.
शेवटचे आधी सांगतो. सुरेश चांदवणकरांनी अतिशय आस्थेने बाईंच्या गायनाचे, मुलाखतीचे ध्वनीचित्र-दर्शन घडवलं.
या आधी झालेला वैशिष्ट्यपूर्ण भाग दोन सुबक-सुंदर शिंपल्यांत मोती असावा तसा मौलिक होता.या भागात प्रा. केशव परांजपे या कल्पक आणि मर्मज्ञ संयोजकाने गानसरस्वती किशोरी आमोणकरांना धोंडूताईंच्या संदर्भात बोलते केले.
आदल्याच दिवशीच्या लोकसत्ता पुरवणीतील "धोंडुताईंच्या संदर्भात " लेखातून किशोरीबाईंनी आपले चितन मांडले होते. पण या निमित्ताने त्या, त्यांचा स्वर त्या चिंतनाला लाभला आणि त्यामुळेच ते अधिक रसपूर्ण झाले. रागाचे व्याकरण तेच असावे पण प्रत्येक कलावंताचा तर सोडाच पण त्याच त्या कलावंताचाही तोच राग प्रत्येक वेळी नवलनवे रुपडे घेऊन प्रकटावा तसेच काहीसे …. काही वेगळ्या 'जागा' घेत किशोरीबाईंनी धोंडुताईंची स्मृतीबंदिश मांडली. त्यातील काही वेचक… वेधक…
> धोंडुताईंचा अनन्यसाधारण आ S कार.
> व्रती विदुषी.
> कलावती कमी आणि शास्त्रवेत्ती अधिक.
> घराण्याच्या चौकटीत राहून कलाराधन… संयमित, निष्ठावान म्हणून नितांत आदरणीय.
> आज गायलेले तीनही शिष्य,त्यांचे सादरीकरण हेच त्यांच्या गुरु म्हणून अधिकाराची उत्तम साक्ष देतात.
> या तीनही शिष्यांचे संपूर्ण गायन किशोरीबाईंनी समोर बसून मनापासून दाद देत ऐकले आणि बोलताना " असं शांत बढतीचं , ठेहेरावाचं, आकाराचं आणि सूर-तालाच्या संवादाचं गाणं आज अन्य कुठे दिसत नाही " या शब्दांत कौतुकही केले.
> धोंडुताईंच्या जाण्याच्या संदर्भात त्या म्हणाल्या, "अशी व्रतस्थ व्यक्ती जाते तेव्हा प्रत्यक्ष पृथ्वीलाही आपली लेक गेल्याचे दुःख होते, मग माझी व्यथा वेगळी काय सांगू ?"
कार्यक्रम झाल्यावर निघालो पण कानांत गुंजन सुरूच होते… ते असे :

दर्वळे व्रतगंध ज्यांतून आज गाणे स्तब्ध ते
शुद्ध निश्चल धैवताची आस अजुनी गुंजते /

गवसणीच्या आड ना हरवेल स्वर-गंगौघ तो
छेडिल्याविण धैवताचा नाद हा संवादतो /

नाद-'लक्ष्मी'च्या कला-कमळातल्या 'केसर'-धनां
पूजिले जोपासले अन अर्पिले नव गुणीजनां /

परिमळे नव 'दीपिके'तून नव 'ऋचे'ची स्वरप्रभा
उजळितो 'आदित्य' उज्ज्वल संगिताच्या नवनभा /

लय जिची तालासवे संवाद साधे स्वरमयी
'जय'कुलातील ज्ञानदा 'अत्तर सुगंधें' चिन्मयी /

अनाघात समेवरी ध्यानस्त'सा' ठेहेराव हा
धूप होऊन योगिनीचा दर्वळे स्वरभाव हा /
 (4 photos)




                                                  
25/06/2014






काल पुण्यात होतो.भाग्य असे की तुकोबारायांची वारी पाहिली. या वर्षी वारीसाठी आळंदीला जाण्याचे योजत होतो.पण भाग्य नासले आणि जाणे जुळले नाही.पण एका बैठकीसाठी पुण्यात आलो आणि वारीचा वारा चाखला.
वारी हुकलेल्या मला वारीला निघालेले सांगोन गेले :
तुकयाकारणे...
तुकयाची हाक /परिसली ज्यांनी /
मिसळले जनीं / वारीलागी ||
वारीलागी निघे / सारे गणगोत /
अंतरात ज्योत / उजळली ||
उजळली मने / फिटला अंधार /
सारला संसार / निजहस्ते ||
निजहस्ते केले / उघडे कवाड /
हरीचे पवाड / गात आलो ||
गात आलो वाटे /तुकया कारणे /देहुतून त्याने / हाक दिली ||
Photo

23/06/2014