Tuesday 15 July 2014


                                          ।। गानयोगिनीचे जाणे : एक व्रतविराम ।।

परवा सोमवारी दि.२३ जूनला वांद्रयाच्या शारदा संगीत विद्यालयात गानयोगिनी पंडिता धोंडूताई कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी त्यांची शिष्या सौ. स्मिता भागवत बाईंच्या विषयी त्यांच्या स्वभावाला साजेसे साधंसुधं पण अगदी नेमकं बोलली.बाईंच्या ॠतुजा लाड, दीपिका भिडे आणि आदित्य खांडवे 
या तरूण शिष्यांचे स्मृतिधन्य गाणं झालं.याती भागवत आणि विनोद पडगे या तरूणांची साथसंगतही अनुरूप होती.
शेवटचे आधी सांगतो. सुरेश चांदवणकरांनी अतिशय आस्थेने बाईंच्या गायनाचे, मुलाखतीचे ध्वनीचित्र-दर्शन घडवलं.
या आधी झालेला वैशिष्ट्यपूर्ण भाग दोन सुबक-सुंदर शिंपल्यांत मोती असावा तसा मौलिक होता.या भागात प्रा. केशव परांजपे या कल्पक आणि मर्मज्ञ संयोजकाने गानसरस्वती किशोरी आमोणकरांना धोंडूताईंच्या संदर्भात बोलते केले.
आदल्याच दिवशीच्या लोकसत्ता पुरवणीतील "धोंडुताईंच्या संदर्भात " लेखातून किशोरीबाईंनी आपले चितन मांडले होते. पण या निमित्ताने त्या, त्यांचा स्वर त्या चिंतनाला लाभला आणि त्यामुळेच ते अधिक रसपूर्ण झाले. रागाचे व्याकरण तेच असावे पण प्रत्येक कलावंताचा तर सोडाच पण त्याच त्या कलावंताचाही तोच राग प्रत्येक वेळी नवलनवे रुपडे घेऊन प्रकटावा तसेच काहीसे …. काही वेगळ्या 'जागा' घेत किशोरीबाईंनी धोंडुताईंची स्मृतीबंदिश मांडली. त्यातील काही वेचक… वेधक…
> धोंडुताईंचा अनन्यसाधारण आ S कार.
> व्रती विदुषी.
> कलावती कमी आणि शास्त्रवेत्ती अधिक.
> घराण्याच्या चौकटीत राहून कलाराधन… संयमित, निष्ठावान म्हणून नितांत आदरणीय.
> आज गायलेले तीनही शिष्य,त्यांचे सादरीकरण हेच त्यांच्या गुरु म्हणून अधिकाराची उत्तम साक्ष देतात.
> या तीनही शिष्यांचे संपूर्ण गायन किशोरीबाईंनी समोर बसून मनापासून दाद देत ऐकले आणि बोलताना " असं शांत बढतीचं , ठेहेरावाचं, आकाराचं आणि सूर-तालाच्या संवादाचं गाणं आज अन्य कुठे दिसत नाही " या शब्दांत कौतुकही केले.
> धोंडुताईंच्या जाण्याच्या संदर्भात त्या म्हणाल्या, "अशी व्रतस्थ व्यक्ती जाते तेव्हा प्रत्यक्ष पृथ्वीलाही आपली लेक गेल्याचे दुःख होते, मग माझी व्यथा वेगळी काय सांगू ?"
कार्यक्रम झाल्यावर निघालो पण कानांत गुंजन सुरूच होते… ते असे :

दर्वळे व्रतगंध ज्यांतून आज गाणे स्तब्ध ते
शुद्ध निश्चल धैवताची आस अजुनी गुंजते /

गवसणीच्या आड ना हरवेल स्वर-गंगौघ तो
छेडिल्याविण धैवताचा नाद हा संवादतो /

नाद-'लक्ष्मी'च्या कला-कमळातल्या 'केसर'-धनां
पूजिले जोपासले अन अर्पिले नव गुणीजनां /

परिमळे नव 'दीपिके'तून नव 'ऋचे'ची स्वरप्रभा
उजळितो 'आदित्य' उज्ज्वल संगिताच्या नवनभा /

लय जिची तालासवे संवाद साधे स्वरमयी
'जय'कुलातील ज्ञानदा 'अत्तर सुगंधें' चिन्मयी /

अनाघात समेवरी ध्यानस्त'सा' ठेहेराव हा
धूप होऊन योगिनीचा दर्वळे स्वरभाव हा /
 (4 photos)




                                                  
25/06/2014






No comments:

Post a Comment