Tuesday, 15 July 2014



|| कलाकालिंदीतील कालिया || 

आज लोकसत्तेने पहिल्याच पानावर प्रकाशित केलेली बातमी संतापजनक आहेच पण चिंताजनक अधिक आहे. वासुदेव कामत या ज्येष्ठ चित्रकाराने काढलेल्या एका चित्राच्या विना अनुमती प्रती काढून त्यांची विक्री करण्यात आली.आणि हा अपराध झाकण्यासाठी त्या कलादुष्ट बदमाषाने केलेला दुसरा गुन्हा अधिक क्षोभजनक आहे.
वासुदेव कामतांनी आपल्या चित्रांनी कलाविश्वात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेआहे. आजवर विविध संकल्पना त्यांच्या प्रतिभावान रेषेने रूपबद्ध केल्या आहेत. छत्रपती शिवरायांचे जीवन हे सर्वसामान्यांबरोबरच सर्वच क्षेत्रातील प्रतिभावंतांनाही साद घालत असतं. त्यातूनच त्यांचा शिवरायांच्या चिरप्रेरक जीवनाचा सत्त्वशोध सुरू होतो. त्यातूनच कामतांची अनेक वैशिष्टयपूर्ण शिवचित्रे साकार झाली. त्यातील एक चित्र मुंबईतील म्हाडाच्या कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. 

शिवछत्रपींच्या या चित्राचे वेगळेपण सांगायलाच हवे. आजवर अनेक कलावंतांनी सिंहासनाधिष्टित राजांची चित्रे रेखाटली आहेत पण त्या चित्रांत थेट समोरून महाराज- मुद्रा चित्रित केलेली अभावानेच आढळते.
वरील उल्लेखिलेल्या बातमीतील वासुदेव कामतांचे चित्र तसं चित्रित केलेलं आहे.तेच त्याचे मौलिक वेगळेपण आहे.
बातमीतील कलेचा काळाबाजार मांडताना ते चित्र शिवरायांच्या समकालिन कुणा डच चित्रकाराने रेखाटल्याचे सांगत त्या बदमाषाने अधिक पैसे उकळले. त्याने चित्ररसिकांची घोर दिशाभूल केलीच पण चित्रकार कामतांच्या कलाश्रेयालाही हरताळ फासला.
एखाद्या कलावंताचे कलाश्रेय असे एखाद्या समकालिन कलादुष्ट बाजारबुणग्याने हिरावून 
घेण्याचा हीन प्रयत्न करावा हे अधिकच चिंतेचे वाटते.
केवळ कलावंतच नाही तर कलाविद्यार्थी, अध्यापक, प्रदर्शक, कलारसिक आणि या कला-कालिंदीवर आपले समाधान मिळविणारे सर्व अशा सर्वांचाच द्रोह या कालियाने केला आहे.त्याचे वेळीच मर्दन करणे न्यायाचे होईल.


कोण हा भामटा / घालितसे डाका/
सोकावला बोका / चोरीसाठी //

म्हणे चित्रकार / कुणी एक डच्चू /
देत थेट डच्चू / चित्रकारा //

चित्रकारा केले / श्रेयासि वंचित /
केले कलंकित / कलाविश्व //

दुष्कर्माने ऐशा /कलेच्या राऊळा /
बाजाराची कळा / ग्रासतसे //

विटे रंगपट / पांगुळते रेखा /
कलेसी विळखा / कालियाचा //

वासुदेवे केले / तेव्हा निर्दालन /
पुनश्च स्मरण / झाले आजि //

अलक्षित गड / खाने बळकावा /
तैसाची हा कावा / कालियाचा //

परि असंभव / क्षय कीर्तीचंद्रा /
सांगे शिवमुद्रा / समोरूनी //

03/07/2014

No comments:

Post a Comment